गाझियाबाद, 07 नोव्हेंबर : बऱ्याचवेळा लहान मुलं खेळता-खेळता अनेक उद्योग करतात. त्यांच्याकडे लक्ष ठेवलं नाही तर मोठ्या दुर्घटनाही घडतात अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. आई-वडील घरात नसताना खेळता खेळता 5 वर्षांचा चिमुकला बाल्कनीत आला. त्याला खाली काय चालू आहे हे पाहण्याचं कुतूहल होतं. यासाठी त्यानं आपलं छोटं स्टूल घेतलं त्यावर चढला आणि खाली पाहण्याच्या प्रयत्नात घात झाला. तोल जाऊन 5 वर्षांचा चिमुकला थेट खाली कोसळला.
14 व्या मजल्यावरून 5 वर्षांचा चिमुकला खाली कोसळल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील सिहानी गेट पोलिस स्टेशन परिसरातील राजनगर विस्तार क्षेत्रातील पॉश व्हीव्हीआयपी सोसायटीमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खाली कोसळलेल्या चिमुकल्याला तिथल्या स्थानिकांनी तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
हे वाचा-ना लस ना औषध, आता 'या' Antibodies कोरोनाचा कायमचा खात्मा करणार
डॉक्टरांनी चिमुकल्याला मृत घोषित केलं. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चौकशी सुरू केली आहे. तेजस्व चरण असं या 5 वर्षांच्या चिमुकल्याचं नाव आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तेजस्व गाझियाबादमधील इंग्रहाम शाळेचा विद्यार्थी होता. आई-वडील आणि तेजस्व असे व्हीव्हीआयपी सोसायटीमध्ये 14 व्या मजल्यावर राहात होते.
सोसायटीतील महिलेनं दिलेल्या माहितीनुसार चिमुकल्याची आई नर्स आहे तर वडील कंपनीत काम करतात. शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात होण्यापूर्वी तेजस्वचे आई-वडील दोघंही बाहेर गेले होते. त्यावेळी चिमुकला बाथरूममधून बाल्कनीत आला. त्यावेळी त्याला खाली वाकू पाहायचं होतं. त्यासाठी त्यानं स्टूल आणलं आणि चढायला गेला तेव्हा त्याचा तोल जाऊन थेट बाल्कनीतून 5 वर्षांचा चिमुकला खाली कोसळला.