जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'गुंडाराज संपलं, उत्तर प्रदेश आता पूर्वीसारखा नाही तर जागतिक दर्जाचा 'उत्तम प्रदेश'

'गुंडाराज संपलं, उत्तर प्रदेश आता पूर्वीसारखा नाही तर जागतिक दर्जाचा 'उत्तम प्रदेश'

'गुंडाराज संपलं, उत्तर प्रदेश आता पूर्वीसारखा नाही तर जागतिक दर्जाचा 'उत्तम प्रदेश'

भाजपा सरकार हे समाज आणि येथील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत आहे, असं योगी म्हणाले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

लखनऊ, 5 जानेवारी : गुंडाराज संपलं. उत्तर प्रदेश आता पूर्वीसारखा नाही. आता हा उत्तम प्रदेश आहे, असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केलं आहे. राज्यात (उत्तर प्रदेश) गुंतवणूक वाढवण्याच्या उद्देशानं सरकार कामाला लागलं असून आदित्यनाथ मुंबईतही आले आहेत. विविध उद्योगपती, बॉलिवूड कलाकार यांच्याशी चर्चा करत उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढवण्यासाठी त्यांनी मॅरेथॉन बैठका काल आयोजित केल्या होता.

देशांतर्गत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशानं ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटपूर्वी (Global Investors Summit) रोड शो आयोजित करण्यात आले आहेत. देशभरातल्या नऊ प्रमुख शहरांमध्ये हे रोड शो होणार आहेत. 5 जानेवारी ते 27 जानेवारी दरम्यान आयोजित या रोड शोची सुरुवात मुंबईपासून झाली आहे. दोन दिवसीय हा दौरा असणार आहे.

‘गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि फायद्याचं’

विविध कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री योगी उत्तर प्रदेशचं चित्र मांडणार आहेत. देशभरातल्या प्रमुख औद्योगिक समूहांच्या प्रतिनिधींचीही भेट ते घेणार आहेत. यूपी हे गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि फायद्याचं असल्याचं ते पटवून देणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत योगी 4 जानेवारीला (बुधवार) लखनौहून मुंबईला आले. काल संध्याकाळी त्यांनी उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात आलेल्यांची भेट घेतली. यावेळी त्यांना नवीन संधींबद्दल माहितीही योगींनी दिली. तसेच फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटबाबतही माहिती दिली.

‘नकारात्मक विचारांत बदल’

उत्तर प्रदेशाचं गुंड, हिंसाचार, अराजकता आणि असंच बरंच काही चित्र आता बदललं आहे. भाजपा सरकार हे समाज आणि येथील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत आहे, असं योगी म्हणाले. मागील सरकारनं राज्यात नकारात्मकता भरली. त्यामुळे राज्य मागे गेले. आता भाजपा ही नकारात्मकता दूर करून राज्याला पुन्हा सन्मानाचं स्थान मिळवून देणार असल्याचा दावा त्यांनी केला.

2021मध्ये, मुख्यमंत्री योगी म्हणाले होते, की भाजपा सरकार सर्वांगीण विकासावर भर देत आहे. विविध विकासकामं आणि गुन्हेगारी कमी झाल्यामुळे भाजपा ‘प्रो-इन्कम्बन्सी’ अनुभवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या मार्गदर्शनावर राज्य चालत आहे. या माध्यमातून पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि समाजकल्याण उपायांची अंमलबजावणी राज्यानं केली. हे देशाच्या वाढ आणि विकासाचं इंजिन बनणार, असं ते म्हणाले.

Yogi Adityanath :युपीमध्ये गुंतवणुकीसाठी योगींचा मुंबईत रोड शो, उद्योगपतींशी चर्चा करणार

मागील काँग्रेस, बसपा आणि सपा सरकारच्या काळात राज्याचं मोठं नुकसान झालं. सहाजिकच त्यामुळे राज्याला बदनामीला सामोरं जावं लागलं. ही हानी भरून काढून राज्याला देशात सन्मानाची ओळख मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा दावा त्यांनी केला. उत्तर भारतीयांना आता देश-परदेशात त्यांच्या ओळखीचा अभिमान वाटतो, जो पाच वर्षांपूर्वीपर्यंत वाटत नव्हता. ते त्यांची ओळख, राज्य लपवायचे. आता तसं होत नाही, असं ते स्थलांतरितांच्या मुंबईतल्या मेळाव्यात बोलत होते.

योगी आदित्यनाथ या माध्यमातून गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करत असले तरी यावर टीका होतेय. सपा नेते आणि विरोधीपक्ष नेते अखिलेश यादव यांनी बुधवारी लखनौमध्ये योगींवर आसूड ओढले. आगामी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट म्हणजे धूळफेक असल्याची खिल्ली त्यांनी उडवली.

मागील शिखर परिषदेनंतर प्रत्यक्ष काय अंमलबजावणी झाली, हे आधी त्यांनी सांगावं, असं आव्हान त्यांनी दिलंय. आपल्या मंत्र्यांना परदेशात पाठवायचं, मग स्वतः इतर शहरांना भेटी द्यायच्या. मात्र गुंतवणुकीसाठी त्यांचं औद्योगिक धोरण काय आहे? शहरांतल्या वाढत्या लोकसंख्येच्या समस्येचा सामना करण्यासाठी देशाला अधिक स्मार्ट शहरांची गरज आहे, असं अखिलेश म्हणाले. ग्रामीण भागातल्या लोकांना सरकारनं आधी मुलभूत सुविधा तसंच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. असं केल्यास शहरांमध्ये होणार स्थलांतर कमी होईल, असंही ते म्हणाले.

UPGIS-23 आणि उद्दिष्ट? 

उत्तर प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023, 10-12 फेब्रुवारीदरम्यान लखनौमध्ये आयोजित करण्यात आलीय. उत्तर प्रदेश सरकारचा हा प्रमुख गुंतवणूक कार्यक्रम आहे. 3 दिवस ही समिट असणार आहे. यात उद्योगपती, व्यावसायिक तसेच शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित सामाजिक-राजकीय हस्ती सहभागी होतील. देशाला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या व्हिजनचा UPGIS 2023 हादेखील एक भाग असणार आहे. त्या दृष्टीनं उत्तर प्रदेश सरकारनं पुढील 5 वर्षांत राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. या अनुषंगानं उत्तर प्रदेश सरकारनं अमेरिका आणि कॅनडामधल्या कंपन्यांसोबत जवळपास 19,265 कोटी रुपयांचे प्रारंभिक करार केलेत.

सामंजस्य करार आणि गुंतवणूक

41,000 कोटींहून अधिक किंमतीच्या 27 पैकी आठ प्रस्तावांना सामंजस्य करारात (एमओयू) रूपांतरित करण्यात आलं. या सामंजस्य करारांपैकी 4 धोरणात्मक भागीदारीवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. उर्वरित 19 प्रस्तावांवरच्या सामंजस्य करारांवर GIS-23च्या आधी स्वाक्षरी होण्याची शक्यता व्यक्त होतेय. आतापर्यंतच्या या सामंजस्य करारांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक लॉजिस्टिक, संरक्षण आणि एरोस्पेसमधली असणार आहे.

मोबिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर 

मोबिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुप 8,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे जवळपास मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी राज्यात निर्माण होणार आहेत. क्यूएसटीसी (QSTC Inc) संरक्षण आणि एरोस्पेसमध्ये 8,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. यामुळेही अनेकांना रोजगार मिळणार आहे.

आरोग्य सेवा क्षेत्र

राज्य सरकार आणि आरोग्य सेवा क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये एकूण 2,055 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. या अंतर्गत माय हेल्थ सेंटर आणि झेटएमकयू (ZMQ) कंपन्या या अनुक्रमे 2,050 कोटी आणि 5 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहेत. डिझेरो लॅब्स (Dezero Labs Inc) कंपनी वैद्यकीय उपकरणांमध्ये जवळपास 10 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण होणार असल्याचे उत्तर प्रदेश सरकारनं म्हटलं आहे.

इलेक्ट्रॉनिक, हॉस्पिटॅलिटी

ग्राहकोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठीदेखील या भेटीदरम्यान सामंजस्य करारह झाले आहेत. अकुवा टेक्नॉलॉजी या क्षेत्रांमध्ये 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ऑप्युलेन्स मॅनेजमेंट कॉर्पोरेशन हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. व्हर्चुबॉक्सनं इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केला आहे. यात 200 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

योगी-अक्षय भेट!

उत्तर प्रदेशला चित्रपटाशी संबंधित गुंतवणूक आणि शूटिंगसाठी डेस्टिनेशन म्हणून सज्ज करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अभिनेता अक्षय कुमार-आदित्यनाथ यांची मुंबईत भेट झाली. यावेळी उत्तरेकडच्या राज्यांमध्ये फिल्म सिटीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळळी अक्षय कुमारनं आदित्यनाथ यांना आपला ‘राम सेतू’ हा सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं. उत्तर प्रदेशातल्या आगामी फिल्म सिटीची उत्सुकता आहे. हा एक नवा पर्याय मिळणार असल्याचे अक्षय म्हणाला. तर विषय निवडताना चित्रपट निर्मात्यांनी सामाजिक आणि राष्ट्रीय जाणिवेची जाण ठेवायला हवी, असे आदित्यनाथ म्हणाले. सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टमसह नवीन चित्रपट धोरण आपलं सरकार आखणार आहे. उत्तर प्रदेशची फिल्म सिटी ही जागतिक दर्जाची असणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनीअक्षय कुमारला उत्तर प्रदेश भेटीचं निमंत्रणही दिलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात