उत्तर प्रदेश, 19 फेब्रुवारी: झाशीच्या (Jhansi) गरौठा विधानसभा मतदारसंघातील (Garautha assembly constituency) भाजप नेत्याच्या (BJP leader)घरावर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनंतर मोंठ परिसरात तणावाचे वातावरण पाहता तेथे पीएसी तैनात करण्यात आली आहे. भाजप नेत्याच्या घराची मोठ्या प्रमाणात (house was vandalized) तोडफोड करण्यात आली आणि कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली. सपा उमेदवार दीपनारायण सिंह यादव यांच्यावर या हल्ल्याचा आरोप पीडित विपिन पाठक (Vipin Pathak) यांनी पोलिसांत केला आहे. सपा कार्यकर्त्याच्या सफारीमध्ये दारू पकडल्यानंतर प्रकरण आणखी चिघळलं. यामध्ये दारूची वाहतूक करणाऱ्यांना भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं. यानंतर सपा उमेदवारानं दारूसह पकडलेल्या लोकांना पोलीस ठाण्यातून सोडवून भाजपवर कट रचल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारची आहे. दुपारी सपाचे तीन कार्यकर्ते सफारीत दारू घेऊन जाताना पकडले गेले. त्यांना भाजप कार्यकर्त्यांनीच पकडले. त्यानंतर ते पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अटक करण्यात आलेल्या लोकांनी सपा उमेदवाराचे नाव घेऊन निवडणुकीत त्यांच्यासाठी दारूचे वाटप केल्याचे मान्य केले. पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर सपा उमेदवार दीपनारायण सिंह यादव यांनी पोलीस स्टेशन गाठून अटक केलेल्या लोकांची सुटका केली आणि भाजप आमदाराच्या मुलावरच त्यांच्या कारमध्ये दारू ठेवल्याचा आरोप केला जात आहे. त्याच्यावर मारहाणीचाही आरोप करण्यात आला आहे. भाजप नेते आणि आमदार प्रतिनिधी विपीन पाठक यांच्या घरावर मोंठ पोलीस ठाण्यामधून बाहेर पडताच हल्ला करण्यात आला. त्यांचे घर पोलीस ठाण्याजवळ आहे. विपिन यांनी पोलिसांना माहिती दिली आणि सांगितले की सपा उमेदवार दीपनारायण सिंह यादव आणि त्यांचा मुलगा मून यादव यांनी बऱ्याच लोकांसह हल्ला केला आणि घरातील सर्व सामान फोडले. नातेवाईकांना मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच भाजप आमदार जवाहर राजपूत हेही घटनास्थळी पोहोचले. भाजप आमदार जवाहर राजपूत यांनी सपा उमेदवारावर गंभीर आरोप केले आहेत. यासोबतच त्यांनी निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार पाठवून कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात आमदाराने आरोप केला आहे की, गरौठा विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार दीपनारायण सिंह यादव मतदारांना प्रभावित करण्यासाठी सतत दारू, पैसे वाटप करत आहेत. शुक्रवारी समाजवादी पक्षाच्या लोकांच्या गाडीतून दारूच्या दोन पेट्या पकडण्यात आल्या. सपा उमेदवार दीपनारायण सिंह यादव यांच्या सांगण्यावरून ते दारूचे वाटप करण्यासाठी जात होते, असे अटक करण्यात आलेल्या लोकांनी पोलिसांसमोर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. यानंतर सपाचे उमेदवारानं रागात पोलीस ठाणे गाठलं आणि दारूसोबत पकडलेल्या आपल्या लोकांना सोडवलं. सपाच्या उमेदवाराने पोलीस ठाण्यातच पत्रकारांसमोर धमकीचं वक्तव्य केलं, त्यात त्यांनी आता निवडणूक नंतर लढणार आणि आधी भाजपच्या लोकांशी लढणार असल्याचं म्हटलं आहे. या वक्तव्यानंतर लगेचच दीपनारायण सिंह यांच्या सांगण्यावरून सपा कार्यकर्त्यांचा जमाव पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भाजप उमेदवार विपिन पाठक यांच्या घरात घुसला आणि घरात घुसून कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.