आग्रा, (उत्तर प्रदेश) 11 मार्च : आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहाल (Taj Mahal) परिसरात महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) निमित्ताने शंकराची पूजा करण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणात ताजमहालच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या (CRPF) जवानांनी तीन जणांना ताब्यात घेतलं. त्यानंतर या सर्वांना उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिलं.
काय आहे प्रकरण?
हिंदू महासभेचे (Hindu Mahasabha) प्रांत अध्यक्ष मीना दिवाकर (Meena Diwakar) ताजमहाल परिसरामध्ये कार्यकर्त्यांसह गेले होते. त्यांनी ताजमहालमध्ये डायना बेंचवर बसून शंकराची पूजा करण्यास सुरुवात केली. 'ताजमहाल ही वास्तू तेजोमहाल आहे' असा दावा त्यांनी केला. या कार्यकर्त्यांनी शंकराची आरती सुरू करताच सीआरपीएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मीना यांच्यासह तिघांना ताब्यात घेतलं. या घटनेची माहिती मिळताच हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ता संजय जाट यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करत मीना यांच्यासह सर्वांना सोडण्याची मागणी केली.
ताजमहालाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी डायना बेंचवर बसून हनुमान चालिसाचं पठन केलं होतं. त्या घटनेचा फोटो सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला होता. सध्या ताजमहालमध्ये शहाजहाँचा ऊरुस सुरू आहे. त्यामुळे या संरक्षित परिसरात अन्य कोणताही कार्यक्रम करण्यास मनाई आहे.
( बाइक चालवताना स्टंट करणं पडलं महाग, VIDEO व्हायरल होताच पोलिसांनी केली अटक )
स्थानिक प्रशासनाचे स्पष्ट आदेश आणि सुरक्षा रक्षकांची उपस्थिती असूनही ताजमहालमध्ये शंकराची पूजा करण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे ताज महालच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Taj Mahal, Uttar pradesh