लखनऊ, 14 ऑगस्ट : आपण कधी कल्पनाही करु शकत नाही इतके भयानक कट काही विकृत मनाचे नराधम आखत असतात. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत असताना उत्साहाचं वातावरण असताना एक धक्कादायक बातमी समोर आली. उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशच्या एटीएसने राज्यातून दोन वेगवेगळ्या भागातून दोन तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. हे दोन्ही आरोपी हे जैश-ए-मोहम्मद आणि तहरीक-ए-तालिबान या खतरनाक दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होते. त्यांचा भारतात मोठा घातपात घडवण्याचा डाव होता. पण त्यांचा डाव पूर्ण होण्याआधी पोलिसांनी त्यांना जेरबंद केलं.
भारतातील शांतता भंग करण्याचा कट रचनाऱ्या दोन संशयित आरोपींना एटीएसने अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी हे जैश-ए-मोहम्मद आणि तहरीक-ए-तालिबान या दहशतादी संघटनांशी संबंधित आहेत. खरंतर एटीएसने पहिल्या आरोपीला शुक्रवारी अटक केली होती. या संशयित आरोपीचं नाव मोहम्मद नदीम असं आहे. त्याला दहशतवाद्यांनी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या हत्येचा टास्क दिला होता. हा आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये असलेल्या अतिरेक्यांच्या संपर्कात होता. एटीएसच्या तपासात याबाबतची महत्त्वाची माहिती उघड झाली आहे.
(विधवा आईचे प्रेमसंबंध असल्याचा संशय, पोटच्या मुलाने केलं संतापजनक कृत्य)
उत्तर प्रदेश एटीएसने सहारनपूर जिल्ह्यातील गंगोह पोलीस ठाणे क्षेत्रातील कुंडा कला गाव येथून शुक्रवारी नदीमला ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्याने आपण अतिरेक्यांच्या संपर्कात असल्याचं आणि आपल्याला नुपूर शर्मा यांच्या हत्येची जबाबदारी दिल्याचं कबूल केलं होतं. पोलिसांनी नदीमचा मोबाईल, दोन सीम कार्ड, बटनवाला चाकू, तसेच विविध प्रकारचे बॉम्ब तयार करण्याचं साहित्य जप्त केलं आहे.
आरोपी नदीम हा टीटीपीचा अतिरेकी सैफुल्लाह याच्याकडून प्रशिक्षण घेत होता. त्याने सफुल्लाकडून बरीच माहिती गोळा केली होती. नदीम हा कोणत्यातरी सरकारी कार्यालयात किंवा पोलीस ठाण्यात हल्ला करण्याच्या तयारीत होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. नदीमने दिलेल्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी त्याचा सहकारी अतिरेकी सैफुल्लाह याला कानपूर येथून बेड्या ठोकल्या आहेत. या सैफुल्लाह यानेदेखील आपण जैश-ए-मोहम्मदच्या संपर्कात होतो, हे कबूल केलं आहे. हे आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताविरोधात तरुणांच्या मनात विष पेरायचे. भारतात घातपात घडवण्याचे डाव आखायचे. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांनी 50 फेक आयडी तयार केलेले होते.
एटीएसने केलेल्या तपासात काही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. आरोपी सैफुल्लाह हा 19 वर्षांचा आहे. तो उत्तर प्रदेशातील फतेहपूरचा रहिवासी आहे. त्याने नदीमला ट्रेनिंग दिली होती. दोघं सोशल मीडियाच्या माध्यमातून भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील तरुणांचे ब्रेनवॉश करायचे. सैफुल्लाने 70 पानांची पीडीएफ कॉपी नदीमला पाठवली होती. त्यात सर्व प्रशिक्षणविषयी माहिती होती. एटीएस आणि उत्तर प्रदेश पोलिसांचा या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Terrorist, Terrorist attack, Terrorists