माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारमधल्या राजकारणात काही वेळा किंग मेकरची भूमिका निभावलेले ज्येष्ठ नेते रामविलास पासवान (Ram vilas Pawan)यांचं हृदयविकाराने निधन झालं.
'पापा….अब आप इस दुनिया में नहीं हैं लेकिन मुझे पता है आप जहां भी हैं हमेशा मेरे साथ हैं।' असं भावुक Tweet करत पासवान यांचे पुत्र आणि लोक जन शक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.
बिहारच्या राजकारणातली महत्त्वाची व्यक्ती आणि केंद्रीय पातळीवर किंगमेकर ठरलेले रामविलास पासवान यांनी 2019 मध्येच निवडणूक राजकारणातली 50 वर्षं पूर्ण केली होती.
लोकजनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा असणारे रामविलास पासवान यांनी यापूर्वीही किंगमेकरची भूमिका निभावली होती. आता 2020 च्या विधानसभा निवडणुकीतही बिहारचा मुख्यमंत्री पासवान ठरवणार का अशी चर्चा सुरू असतानाच ही धक्कादायक बातमी आली आहे.
राजकारणाबरोबरच कौटुंबिक जिव्हाळ्याची व्यक्ती म्हणून केंद्रीय मंत्री रामविलास पासवान घरातही आवर्जून वेळ घालवत.
5 जुलै 1946 रोजी बिहारच्या खगडिया इथे रामविलास यांचा जन्म झाला. 1969 मध्ये पासवान यांनी पहिली निवडणूक जिंकली आणि आमदार झाले.
1969 मध्ये संयुक्त सोशलिस्ट पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेले पासवान राज नारायण आणि जयप्रकाश नारायण यांचे अनुयायी होते.
बिहार निवडणुकांचे पडघम वाजायला लागल्यावर 3 ऑक्टोबरला त्यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया झाली होती. पण दिल्लीच्या रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
व्ही. पी. सिंग यांच्यापासून एच.डी.देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी अशा 6 पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात पासवान कॅबिनेट मंत्री होते.