मुंबई, 25 सप्टेंबर: एखाद्या व्यक्तीला त्याच्या नोकरीवरून काढण्याची वेगवेगळी कारणं असू शकतात; पण उत्तर प्रदेशमध्ये एका शाळेत नोकरी करणाऱ्या महिलेला ज्या कारणावरून नोकरीवरून काढलं गेलं आहे, ते ऐकल्यानंतर धक्का बसेल. केवळ ट्रान्सजेंडर असल्यामुळे नोकरीवरून काढल्याचा आरोप संबंधित महिलेनं केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराची संबंधित महिलेनं महिला आयोगाकडेही तक्रार केली आहे. उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खेरी जिल्ह्यातल्या एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून नियुक्त केलेल्या 29 वर्षीय ट्रान्सवुमनला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. शाळेतले काही सहकारी आणि विद्यार्थ्यांना संबंधित महिलेने ती ट्रान्सजेंडर असल्याचं सांगितल्यामुळे तिला राजीनामा देण्यास सांगण्यात आला; मात्र शाळेच्या व्यवस्थापनाने हे आरोप फेटाळून लावले असून महिलेला ज्या विषयासाठी नियुक्त करण्यात आलं होतं, त्यापैकी एक विषय शिकवण्यात ती चांगली नसल्यामुळे तिला काढून टाकण्यात आल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे, महिलेनं आरोप केला आहे की, ‘मला इंग्रजी आणि सामाजिक विज्ञान शिक्षिका म्हणून नियुक्त केले होते. नोकरी देताना माझी कागदपत्रं पाहिल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने मला माझी लिंग ओळख गुप्त ठेवण्यास सांगितलं होतं. नोकरीसाठी नियुक्त करताना माझ्या मुलाखतीचे तीन राउंडही झाले होते. त्यानंतर शाळेने मला नियुक्त केलं. मी 22 नोव्हेंबर 2022 रोजी सामाजिक विज्ञान आणि इंग्रजीसाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) म्हणून नोकरीवर रुजू झाले होते.’ हेही वाचा: आईला फोन केला म्हणून… बापाचं पोटच्या मुलीसोबत निर्दयी कृत्य, बीड हादरलं आठवडाभरातच द्यावा लागला राजीनामा संबंधित महिलेनं सांगितलं, की ‘मला एका आठवड्यानंतर राजीनामा देण्यास सांगण्यात आलं. कारण मी माझ्या शारीरिक वैशिष्ट्यांमुळे इतर महिलांपेक्षा वेगळी दिसत होते. मला शाळेत काही कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून ट्रोल केलं गेलं. मला ‘हिजडा’ असंही म्हटलं गेलं. मग मी विद्यार्थ्यांना समाजाबद्दल आणि अशा लोकांसाठी बनवले जाणारे कायदे, याबद्दल शिक्षित आणि संवेदनशील करण्याचा प्रयत्न केला आणि मी त्या समुदायाचं प्रतिनिधित्व करत असल्याचंही सांगितलं; पण यावरून शालेय प्रशासनानं मला फक्त 10 दिवसांनी म्हणजेच 2 डिसेंबर 2022 रोजी राजीनामा देण्यास सांगितला. मी सामाजिक विज्ञान शिकवण्यासाठी पुरेशी सक्षम नाही, असं कारण शाळा प्रशासनानं दिलं.’ महिलेनं पुढे सांगितलं की, ‘मी दिल्ली महिला आयोगाला 181 वर मदतीसाठी कॉल केला. त्यांनी मला स्थानिक पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला. डीसीडब्लूने स्थानिक पोलिसांना शाळेत पाठवलं. त्यानंतर मला 3 डिसेंबर 2022 रोजी नोकरीवरून कार्यमुक्त केल्याचं पत्र शाळेनं दिलं. यामध्ये मला सामाजिक विज्ञान शिकवण्यात अडचण येत असल्याचं कारण देऊन काढून टाकण्यात आल्याचं म्हटलं होतं. तसंच मी इंग्रजी शिकवण्यात चांगली असल्याचं नमूद करण्यात आलं होतं.’
शाळा व्यवस्थापनाची भूमिका काय? संबंधित महिलेने केलेल्या सर्व आरोपांचं शाळा व्यवस्थापनाने खंडन केलं आहे. शाळेचे व्यवस्थापकीय संचालक सनी गुप्ता म्हणाले, की ‘संबंधित शिक्षिकेला सामाजिक विज्ञान विषय शिकवण्यात येणाऱ्या अडचणीमुळे नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. आम्हाला तिच्या ओळखीबद्दलही माहिती नव्हती. तिच्या लिंगबदलाबद्दल आम्हाला नंतर कळलं; पण त्यामुळे काही फरक पडला नाही. तिने मुलांना शिकवण्यासाठी सुधारण्याची क्षमता दाखवल्यामुळे तिला कामावर घेण्यात आलं होतं. आम्हाला तिला शाळेत परत बघायला आवडेल.’ दुसरीकडे संबंधित महिलेने पुन्हा नोकरी देण्याची मागणी केली आहे. ती म्हणाली, ‘मी सामाजिक विज्ञानासाठी शिक्षक म्हणून पुन्हा शाळेत नोकरी देण्याची मागणी करते आणि मुख्याध्यापकांकडे माफी मागते. प्रशासनानेदेखील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना ट्रान्सजेंडरच्या अधिकारांबद्दल संवेदनशील केलं पाहिजे. एक योग्य तक्रार यंत्रणा उभारली पाहिजे. याबाबत मी आधीच एक याचिका दाखल केली आहे,’ असंही तिनं स्पष्ट केलं. पुरुष म्हणून जन्मलेल्या या महिलेवर 2019 मध्ये इंदूरच्या भंडारी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये लिंगबदल शस्त्रक्रिया झाली. तिच्या मते, ती एक चांगली शिक्षिका आहे आणि तिचे कौशल्य विद्यार्थी आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी मान्य केलं आहे. परंतु तिला जेव्हा राजीनामा देण्यास सांगण्यात आला, तेव्हा मात्र या प्रकाराची जोरदार चर्चा लखीमपूर भागात सुरू झाली आहे.