जाहिरात
मराठी बातम्या / देश / Traffic Noise : ट्रॅफिकचा आवाज वाढवतो तणाव, उच्च रक्तदाबाचा धोका; संशोधनातून झाले स्पष्ट

Traffic Noise : ट्रॅफिकचा आवाज वाढवतो तणाव, उच्च रक्तदाबाचा धोका; संशोधनातून झाले स्पष्ट

फाईल फोटो

फाईल फोटो

ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यावर तुमच्या कानावर गाड्यांचे कर्णकर्कश आवाज पडतात.

  • -MIN READ Trending Desk New Delhi,Delhi
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 1 एप्रिल : धावपळीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकार, डायबेटिससारखे गंभीर आजार होण्याचा धोका वाढला आहे. हृदयविकार, श्वसनाचे विकार जडण्यामागं आणखी एक समस्या कारणीभूत ठरत असल्याचं समोर आलं आहे. रोज आपण कामानिमित्त घराबाहेर पडलो की सर्वप्रथम आपल्याला ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने वाहतुकीची समस्या त्रासदायक ठरू लागली आहे. ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यावर तुमच्या कानावर गाड्यांचे कर्णकर्कश आवाज पडतात. बऱ्याचदा ही गोष्ट आपण फारशी मनावर घेत नाही. पण काही वेळा या ध्वनी आणि वायू प्रदुषणामुळे आपला स्वभाव काहीसा चिडचिडा होतो. तुम्हालादेखील असाच अनुभव येत असेल तर ही स्थिती नक्कीच काळजी करण्यासारखी आहे. कारण रस्त्यावरचा कर्णकर्कश आवाज तुमचा तणाव वाढू शकतो आणि यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो असं एका नवीन संशोधनातून स्पष्ट झालं आहे. याबाबत तज्ज्ञांनी वेगवेगळी मतं मांडली आहेत. `इंडियन एक्स्प्रेस`ने या विषयीची माहिती दिली आहे. ध्वनी प्रदूषणाचा आरोग्यावर होणारा परिणाम या विषयी नुकतंच एक संशोधन झालं. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी (JAAC) अ‍ॅडव्हान्सेसच्या जर्नलमध्ये या संबंधीचा अभ्यास गेल्या आठवड्यात प्रकाशित झाला. या अभ्यासात असं आढळून आलं की रस्त्यावरील ट्रॅफिकच्या आवाजाचा दीर्घकाळ संपर्क आल्यास प्राथमिक उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते आणि प्रत्येक कुटुंबासाठी ही एक धोक्याची घंटा आहे. ट्रॅफिकमुळे होणारा आवाज नियंत्रणात आणण्यासाठी काही धोरणं तयार करावीत, असं आवाहन सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञांनी केलं आहे. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे मानद प्रा.डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांनी सांगितलं, की ``जर तणाव दीर्घकाळ असेल आणि तो कशामुळे येतो यावर आपलं फारसं नियंत्रण नसेल तर उच्च रक्तदाब ही एक प्रस्थापित आरोग्य समस्या बनते.`` 2010 पासून बहुतेक संशोधनांमध्ये, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजारासाठी ट्रॅफिकचा आवाज हा एक महत्त्वाचा पर्यावरणीय जोखीम घटक म्हणून उदयास आल्याचं स्पष्ट झालं आहे. `डब्ल्यूएचओ`च्या ताज्या अहवालानुसार, असा अंदाज आहे की भारतातील चार प्रौढांपैकी किमान एकाला उच्च रक्तदाब आहे. परंतु, त्यापैकी फक्त 12 टक्के लोकांचा रक्तदाब नियंत्रणात आहे. अनियंत्रित रक्तदाब हा हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसाठी मुख्य जोखीम घटकांपैकी एक आहे. तसेच जागतिक स्तरावर मृत्यू आणि रोगाचे सर्वात सामान्य कारण आहे. भारताने 2025 पर्यंत उच्च रक्तदाब 25 टक्के कमी करण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. या विषयी पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाच्या प्रा. राखी डंडोना म्हणतात, ``ध्वनी प्रदूषणाचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे भारतातील रस्ते वाहतूक होय. आवाजाचे स्रोत आणि सार्वजनिक आरोग्यावर होणारा परिणाम या विषयी लोकांना जागरूक केलं पाहिजे. आवाज आणि त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी भारतातला धोरणांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. `` पोलिसांच्या चकमकीत सुरेश रैनाच्या नातेवाईकांच्या खुनी ठार, नेमकं काय घडलं? केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने भारतात परवानगीयोग्य आवाजाची पातळी निश्चित केली आहे. त्यानुसार औद्योगिक क्षेत्रासाठी दिवसा आवाजाची मर्यादा 75 डेसिबल आणि रात्री 70 डेसिबल आहे.व्यावसायिक भागात ही मर्यादा अनुक्रमे 65 आणि 55 डेसिबल तर निवासी भागात दिवसा आणि रात्रीच्या वेळी अनुक्रमे 55 आणि 45 डेसिबल आहे. ``मात्र ध्वनी प्रदूषणाची मान्यता मिळालेली ही पातळी योग्य नाही,`` असं इंडियन चेस्ट सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संदीप साळवी यांनी सांगितलं. ``ध्वनी प्रदूषण उच्च रक्तदाब, निद्रानाश, मळमळ, हृदयविकाराचा झटका, थकवा, चक्कर येणं आणि डोकेदुखी, श्रवणशक्ती कमी होणं यास कारणीभूत ठरू शकतं. याचा परिणाम केवळ माणसावरच होत नाही तर प्राणी, वनस्पती आणि त्यांच्या परागकणांवरही होतो, ``असं डॉ, साळवी यांनी सांगितलं. डॉ. साळवी यांनी अर्थ 5R या पर्यावरणीय स्वयंसेवी संस्थेने केलेल्या जानेवारी 2023 मध्ये केलेल्या सर्वेक्षणाचा दाखला दिला. या अहवालात शांत आणि निवासी भागात आवाजाची पातळी 50 डेसिबल या परवानगी मर्यादेच्या तुलनेत 50 टक्के जास्त असल्याचं म्हटलं आहे. ध्वनी प्रदूषण आणि तणावाबाबत या पूर्वी झालेल्या संशोधनांमध्ये रस्त्यावरील ट्रॅफिकचा गोंगाट आणि उच्च रक्तदाबाचा वाढता धोका यांच्यातील संबंध दिसून आला आहे. मात्र यासाठी सबळ पुरावे उपलब्ध नव्हते. तसेच ध्वनी किंवा वायू प्रदुषणाने यात मोठी भूमिका बजावली की नाही हे स्पष्ट नव्हते. या नवीन विस्तारित संशोधनात यूकेमधील 2,50,000 पेक्षा जास्त लोकांचा समावेश होता. या लोकांचे आठ वर्षांहून अधिक काळ निरीक्षण करण्यात आले. यासाठी संशोधकांनी यूके बायोबँकमधून 40 ते 69 वर्ष वयोगटातल्या आणि उच्च रक्तदाबाचा त्रास नसलेल्यांची निवड केली होती.संशोधकांनी त्यांचा निवासी भाग, युरोपियन मॉडेलिंग टूल, कॉमन नॉइज असेसमेंट मेथडच्या आधारे रस्त्यावरील रहदारीच्या आवाजाचा अंदाज बांधला. ``मध्यंतरीचा 8.1 वर्षांमधील फॉलोअप डाटा वापरून आम्ही किती लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला आहे हे पाहिले,`` असं चीनमधील बीजिंग येथील पेकिंग युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील व्यावसायिक आणि पर्यावरणीय आरोग्य विज्ञान विभागातील सहायक प्राध्यापक आणि या संशोधनाचे प्रमुख जिंग हुआंग यांनी सांगितले. यात संशोधकांना, रस्त्यावरील ट्रॅफिकच्या आवाजाचा सातत्याने त्रास होणाऱ्या लोकांना उच्च रक्तदाब होण्याची शक्यता असते, तसेच या आवाजाचे प्रमाणही धोका वाढवणारे असते, असे दिसून आले. ``आपल्या शरीराचे उत्क्रांतीवादी जीवशास्त्र ट्रॅफिकचा वारंवार होणारा आवाज किंवा इतर कर्णकर्कश आवाजांना चिडचिड वाढवणारे मानते आणि त्यावर प्रतिक्रिया म्हणून तणाव निर्माण होतो. यामध्ये उच्च रक्तदाबाचा समावेश आहे. तसेच वारंवार येणाऱ्या अशा आवाजामुळे झोपेसंबंधी समस्या निर्माण होते आणि तणाव वाढतो. हा अभ्यास डोस-रिस्पॉन्स संबंधदेखील दर्शवितो, जो आवाजाचा आणि उच्च रक्तदाबाचा असलेला संबंध दाखवणारा पुरावा आहे. ज्या भागात जास्त ट्रॅफिक असते, तिथं वायू प्रदूषणाची पातळीदेखील वाढलेली असते. म्हणूनच पीएम 2.5 च्या दीर्घकाळापर्यंत संपर्कामुळे रक्तदाब वाढतो आणि तीव्र उच्च रक्तदाबाचा त्रास होतो, ``असं डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांनी सांगितलं. बेंगळुरूतील हेब्बल येथील मणिपाल हॉस्पिटलमधील ईएनटी स्पेशलिस्ट डॉ. संतोष शिवस्वामी यांच्या मते,`` गोंगाटमय वातावरणामुळे खूप ताण येऊ शकतो. जास्त डेसिबल आवाजाच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास आपल्या ऑटोनॉमिक मज्जासंस्थेवर ताण येतो. ही मज्जासंस्था आपला रक्तदाब, श्वासोच्छवास, हृदयाची गती आणि पचन नियंत्रित करते. जास्त आवाजामुळे कॉर्टिसॉल आणि अ‍ॅड्रेनालाईनसारखे स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात. यामुळे रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तरांचे नुकसान होते. याला एंडोथेलियल डिसफंक्शन म्हणतात. याचा संबंध थेट उच्च रक्तदाब, हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आजारांशी आहे. `` पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील कन्सल्टिंग फिजिशियन डॉ. अभिजित लोढा यांनी सांगितले, ``अनेक प्राणी आणि मानवाबाबत केलेल्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की जे लोक ट्रॅफिक जाम असलेल्या रस्ता किंवा रेल्वे अथवा विमानासारख्या 90 डेसिबल पेक्षा जास्त मोठ्या आवाजाच्या संपर्कात असतात, त्यांना इतर भागात राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. `` प्रा. डंडोना यांच्या मते, ``या नवीन संशोधनाचे निष्कर्ष भारतातील परिस्थितीशी सुसंगत आहेत. अनेक साथीच्या अभ्यासातून ध्वनी प्रदूषणाचा दीर्घकालीन संबंध चयापचय, हृदय, रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार आणि श्वसनविकाराच्या विस्तृत श्रेणीत दर्शवला गेला आहे. दुर्दैवाने भारतातील एक प्रमुख पर्यावरणीय समस्या म्हणून ट्रॅफिकच्या वाढत्या आवाजाकडे पाहिले जात नाही. वाढलेले शहरीकरण, अपुरी शहर रचना, वाहतूक आणि वाढते उद्योग यामुळे ध्वनी प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे,`` असं त्यांनी सांगितले.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात