रायपूर, 3 ऑगस्ट : गावात जमिनीखाली पुरून ठेवलेल्या (Dumped) दारूच्या बाटल्या (Liquor bottles) सापडल्यानंतर त्यातील दारू प्यायल्यामुळे एका ग्रामस्थाचा मृत्यू (Death of a villager) झाला आहे. या बाटल्यांमधील दारू पिणारे अनेक ग्रामस्थ आजारी (Ill) पडले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. छत्तीसगडमधील (Chattisgarh) बलौदाबाजार गावात उकिरड्यापाशी या दारुच्या बाटल्या मिळाल्या.
अशा सापडल्या बाटल्या
सध्या सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे गावच्या उकिरड्यापाशी साठलेला कचऱ्याचा ढीग आणि माती वाहून गेली. त्या ठिकाणी काही बिअरच्या बाटल्या पडल्याचं ग्रामस्थांना दिसलं. त्यांनी त्या बाटल्या उचलल्या, तेव्हा त्याखाली आणखी काही बाटल्या असल्याचं त्यांना दिसलं. मग या ग्रामस्थांनी तिथली जमीन खोदायला सुरुवात केली. ही बाब काही वेळातच वाऱ्यासारखी गावभर पसरली आणि हा प्रकार पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली.
जमीन खणल्यानंतर तिथून सुमारे ट्रकभर दारूच्या बाटल्या सापडल्या. फुकटातील दारू म्हणून ग्रामस्थ अक्षरशः त्यावर तुटून पडले आणि सर्व बाटल्या गावकऱ्यांनी लुटून नेल्या. ही दारू प्यायल्यामुळे गावातील तरुण ललित यदू याचा मृत्यू झाला, तर अनेक गावकरी आजारी पडले.
मुदत उलटून गेलेली दारू
या दारूची एक्सपायरी डेट उलटून गेली असल्याचं तपासणीत दिसून आलं. मात्र ही बाब समजण्यापूर्वीच अनेकांनी ही दारू प्यायली असल्यामुळे ते आजारी पडले. त्यातील अनेकांना रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
हे वाचा -Inside Video'..पंतप्रधान पाणीही विचारत नाही', संजय राऊत यांनी व्यक्त केली नाराजी
महसूल खात्याकडे बोट
ही घटना समजताच स्थानिक आमदारांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. महसूल खात्याच्या संगनमतानंच या बाटल्या जमिनीत गाडून ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या बाटल्या तस्करीच्या असून महसूल विभागानं उत्तर देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तर तस्करीच्या बाटल्या असत्या, तर त्या एक्सपायर होईपर्यंत तिथं राहिल्या नसत्या, असा दावा महसूल विभागातील अधिकारी करत आहेत. मुळात त्या बाटल्या गावात कधी आणि कुणी जमिनीखाली गाडल्या, त्याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chattisgarh, Illegal liquor, Liquor stock