मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोना रुग्णांना 5000 रुपये देण्याची कोणतीही सरकारी योजना नाही; व्हायरल मेसेज खोटा

कोरोना रुग्णांना 5000 रुपये देण्याची कोणतीही सरकारी योजना नाही; व्हायरल मेसेज खोटा

corona

corona

सोशल मीडियावर (Social Media) एक मेसेज खूप व्हायरल (Viral Message) होताना दिसत आहे. कोरोनावरच्या उपचारांसाठी केंद्र सरकार कोरोना फंडातून 5000 रुपये देत असल्याचं यात म्हटलं आहे

मुंबई, 14 जानेवारी : गेल्या काही आठवड्यांपासून देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढताना दिसत आहे. कोरोनाचा (Corona) संसर्ग रोखण्यासाठी काही राज्यांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत; मात्र तरीदेखील कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढताना दिसत आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटचे (Variant) रुग्णही वाढत आहेत. मुंबई आणि दिल्लीत कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णांची प्रकृती गंभीर झाली नाही, तर त्यावर होम आयसोलेशनमध्ये (Home Isolation) स्वस्तात उपचार शक्य असल्याचं डॉक्टर सांगत आहेत. परंतु, रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यास त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करावं, असा सल्लाही तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. याचदरम्यान सोशल मीडियावर (Social Media) एक मेसेज खूप व्हायरल (Viral Message) होताना दिसत आहे. कोरोनावरच्या उपचारांसाठी केंद्र सरकार कोरोना फंडातून 5000 रुपये देत असल्याचं यात म्हटलं आहे. हा मेसेज सरकारकडून पाठवला जात असल्याचा दावा करण्यात येत आहे; मात्र हा मेसेज चुकीचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. याविषयीचं वृत्त `टीव्ही नाइन हिंदी`ने दिलं आहे.

`सबका साथ सबका विकास` या पंचलाइनसह सोशल मीडियावर सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालय (Central Health Ministry) कोरोना फंडातून कोरोनासाठी उपचाराकरिता 5000 रुपये देणार असल्याचं म्हटलं आहे. यासाठी लोकांनी तातडीनं एक फॉर्म भरावा, असंदेखील या व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे.

पीआयबी (PIB) अर्थात प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो या केंद्र सरकारच्या माहिती संस्थेचा फॅक्ट चेक विभाग (Fact Check Department) आहे. हा विभाग सरकार, मंत्रालयं आणि सरकारशी संबंधित विभागांविषयी पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि चुकीच्या माहितीसंदर्भात चौकशी करतो आणि सत्य समोर आणतो. `पीआयबी`च्या फॅक्ट चेक टीमनं या मेसेजची पडताळणी केली असून तो चुकीचा असल्याचं स्पष्ट केलं आहे. हा व्हायरल मेसेज खोटा (Fake Message) असल्याचंही सांगितलं आहे. या संदर्भात `पीआयबी`नं ट्विटच्या माध्यमातून सांगितलं, की `केंद्रीय आरोग्य मंत्रालय कोरोना फंडातून 5000 रुपये रक्कम देत असल्याचा दावा या खोट्या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. नागरिकांनी असे खोटे मेसेज फॉरवर्ड करू नयेत. तसंच अनोळखी वेबसाइटवर वैयक्तिक माहिती देऊ नये. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.`

व्हॉट्सअॅप आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच्या या मेसेजची तपासणी केली असता, अशी कोणतीही योजना केंद्र सरकारनं सुरू केली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तसंच राज्य सरकारांनीही अशा प्रकारच्या मदतीची तरतूद केलेली नाही. `बहुतांश कोरोनाबाधित रुग्णांवर घरीच उपचार शक्य आहेत. होम आयसोलेशनमध्ये राहून डॉक्टर्सनी दिलेली औषधं नियमित घेतल्यास रुग्ण बरे होऊ शकतात. संसर्गामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यास सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णावर मोफत उपचार केले जात आहेत. तपासणीपासून ते औषधांपर्यंतच्या सुविधा मोफत आहेत. अशा स्थितीत उपचारासाठी वेगळ्या पैशांची गरज नाही,` असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मदतीसंदर्भात व्हायरल होत असलेला मेसेज खोटा आहे, हे स्पष्ट होतं.

First published:

Tags: Central government, Corona, Fake