कृष्ण कुमार, प्रतिनिधी नागौर, 2 जून : महिना व्हायला आला पण ही मुंबईची गरमी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. तरी मुंबई आहे म्हणून ठीक, नाहीतर अशा उष्णतेत राजस्थानसारख्या वाळवंटी भागात लोक कसे जगत असतील याचा आपण विचारच करू शकत नाही. त्यात तिथली पाणी टंचाई, अरेरे! पण तुम्हाला माहितीये का? राजस्थानमध्ये एक असं गाव आहे, जिथे वर्षाचे बारा महिने कधीच पाणीटंचाई निर्माण होत नाही. ही बाब ऐकायला अत्यंत सुखद वाटत असली, तरी याचं कारण जरा आश्चर्यचकीत करणारं आहे. येथे एक असं हनुमान मंदिर आहे, ज्यामुळे आम्हाला कधीच पाणीटंचाईचा सामना करावा लागत नाही, अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. इतकंच नाही, तर एकेकाळी जलविभागानेही या मंदिरापुढे हात टेकले होते. त्यामुळे आता हे प्रकरण नेमकं आहे काय, हे जाणून घ्यायलाचं हवं.
राजस्थानातील नागौर जिल्हा ही अत्यंत पवित्र भूमी मानली जाते. या भूमीवर अनेक देवतांचं वास्तव्य होतं, येथे अनेक संत, महात्मा होऊन गेले, अशी मान्यता आहे. या जिल्ह्याच्या रोल गावातील रहिवाशांना पूर्वी प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागायचा. या टंचाईवर कायमचा तोडगा काढण्यासाठी अखेर साल 1983 मध्ये येथे पाण्याची मोठी टाकी बसवण्यात आली. टाकीचं बांधकाम व्यवस्थित पूर्ण झालं, पण शेवटच्या क्षणी ती आपोआप कोसळली. जलविभागाला काही केल्या ही टाकी बसवता येत नव्हती. मग अखेर जलविभाग अधिकारी हनुमानभक्त पुखराज इनाणिया यांनी त्याठिकाणी हनुमान चालीसेचं पठण करून टाकीची पायाभरणी केली. तेव्हापासून टाकीच्या बांधकामात कोणताही अडथळा आला नाही. हा प्रकार पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि गावकऱ्यांनी एकमताने त्याचठिकाणी मारुती मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. पुखराज आणि सर्व गावकऱ्यांनी मिळून त्याचवर्षी तिथे मारुती मंदिर उभारलं. तेव्हापासून हे गाव सुखात नांदत असून जगाच्या पाठीवर कुठेही दुष्काळ आला तरी या गावाला आतापर्यंत कधीच पाण्याची कमतरता भासलेली नाही. तसेच या मंदिरात दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असं येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

)







