नवी दिल्ली, 22 एप्रिल : जम्मू-काश्मीरमध्ये मॉर्निंग शिफ्ट ड्युटीवर जाणाऱ्या 15 सीआयएसएफ (CISF) जवानांनी भरलेल्या बसवर मोठा दहशतवादी हल्ला
(terrorist attack) झाला आहे. ही घटना जम्मूतील चड्ढा कॅम्पजवळ शुक्रवारी पहाटे 4.15 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेल्या सीआयएसएफच्या सूत्रांनी दुजोरा दिला आहे.
काय होता प्लान?
दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला सीआयएसएफच्या जवानांनी तत्काळ प्रत्युत्तराची कारवाई सुरू केली. प्रत्युत्तराच्या कारवाईनंतर दहशतवादी घटनास्थळावरून पळून गेले. बसवर हल्ला करून जास्तीत जास्त जवानांना ठार मारून त्यांची शस्त्रे नष्ट करण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन होता. सैन्यदलाने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे त्यांनी पळ काढला. दरम्यान, या हल्ल्यात 1 सीआयएसएफ जवान शहीद झाला आहे, तर 8 जवान जखमी झाले आहेत. त्याचबरोबर सुरक्षा दलांनी 1 दहशतवाद्याचा खात्मा केला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या हवाल्याने सांगितले की, जम्मू-काश्मीर पोलिसांच्या हवाल्याने सांगितले की, बारामुल्ला चकमकीत एकूण 4 दहशतवाद्यांना कंठस्थान घातले आहे. त्यापैकी सर्वोच्च लष्कर कमांडर युसूफ कांत्रो याचा समावेश आहे. त्याने 2020मध्ये बीडीसी अध्यक्ष सरदार भूपिंदर सिंग यांची हत्या केली होती. आज त्याचा खात्मा करण्यात आला.
हे वाचा - Russia-Ukraine War: युद्ध आणखी भडकणार! रशियाने भाड्याने घेतले 20 हजार सैनिक, काय आहे कारण?
पंतप्रधानांचा दौरा -
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 24 एप्रिलला संभाग जिल्ह्याच्या पल्ली येथे पंचायत दिनाच्या प्रंसगी दौऱ्यावर येत आहे. पंतप्रधान मोदींच्या हल्ल्यापूर्वीच जम्मूमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा मोठा कट होता. दरम्यान, गुरुवारी कठुआमध्ये पाच संशयितांना अटक करण्यात आली होती, त्यांच्याकडून नकाशे आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले होते. या संशयितांच्या चौकशीदरम्यान सुरक्षा यंत्रणांना महत्त्वाची माहिती मिळाली होती, ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मदला हल्ल्याची जबाबदारी देण्यात आली होती.
ठोस माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या पथकांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. जम्मूच्या बाहेरील सुषमा आणि जलालाबाद दरम्यानच्या भागात दहशतवाद्यांची आढळले आणि शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली. सुरक्षा दलांसोबत दहशतवाद्यांची चकमक अजूनही सुरू असून आजूबाजूच्या परिसराला वेढा घातला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.