मुंबई, 11 जुलै: कोरोना महामारीच्या काळात सुरू झालेली वर्क फ्रॉम होम (Work From Home) पद्धत आवरती घेण्याच्या हालचाली आयटी कंपन्यांमध्ये सुरू झाल्या आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएस या कंपनीने हायब्रिड वर्क मॉडेलची अंमलबजावणी 2025 पर्यंत करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे; मात्र तूर्तास तरी वर्क फ्रॉम होम पद्धत टप्प्याटप्प्याने बंद करून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावलं जात आहे. शुक्रवारी (8 जुलै) TCS कंपनीचे सीईओ राजेश गोपिनाथन (Rajesh Gopinathan) यांनी एप्रिल ते जून या तिमाहीतल्या कंपनीच्या कामगिरीबद्दलची माहिती पत्रकारांना दिली. त्या वेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसला बोलावणार असल्याचंही सांगितलं. सध्या तरी कंपनी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये परतण्यास प्रोत्साहन देणार आहे. कोरोनापूर्व काळाइतके किंवा किमान 80 टक्के कर्मचारी ऑफिसमध्ये यावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कंपनीने प्रस्तावित केलेलं 25/25 मॉडेल त्यानंतर अमलात आणलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. कंपनीने एप्रिल 2020मध्ये आपलं 25/25 मॉडेल सादर केलं होतं. कोणत्याही वेळी केवळ 25 टक्के कर्मचाऱ्यांनाच ऑफिसमध्ये येऊन काम करावं लागेल. तसंच, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या एकूण वेळापैकी 25 टक्क्यांपेक्षा जास्त वेळ कधीच कामाच्या ठिकाणी यावं लागणार नाही. प्रोजेक्टच्या टीम्समध्ये केवळ 25 टक्के कर्मचारी Co-located असतील. असं हे 25/25 मॉडेल 2025 सालापर्यंत अमलात आणण्याचं उद्दिष्ट TCS कंपनीने ठेवलं आहे. हेही वाचा - ‘काहीही झालं तरी…’, पाठवणीवेळी नवरीबाईने केला नको तो हट्ट; नवरदेवाने थेट पोलिसात घेतली धाव गोपिनाथन म्हणाले, ‘25/25 मॉडेल नियंत्रित पद्धतीने अंमलात आणण्याची गरज आहे. त्या दिशेने जाण्यासाठी आधी नॉर्मल वर्किंग एन्व्हायर्न्मेंटमध्ये (Nortmal Working Environment) येण्याची गरज आहे. त्यानंतर कयमस्वरूपी हायब्रिड मॉडेल (Hybrid Work Model) राबवता येईल. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना कामावर बोलावत आहोत. आतापासून दर महिन्याला त्या संख्येत सुधारणा झालेली दिसेल.’ अलीकडेच कंपनीने असं जाहीर केलं होतं, की त्यांच्या एकूण 6 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांपैकी 20 टक्के कर्मचारी त्यांच्या ठरलेल्या ऑफिसमधून काम करत नाहीयेत. एप्रिलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोपिनाथन यांनी सांगितलं होतं, की आमच्या 50 हजार वरिष्ठ कर्मचाऱ्यांना आम्ही एप्रिल महिन्यापासूनच आठवड्यातले तीन दिवस ऑफिसला बोलावणार आहोत. त्यानंतर पुढच्या टप्प्यातल्या कर्मचाऱ्यांना बोलावलं जाईल. त्यामुळे 2022च्या मध्यात आमचे 80 टक्के कर्मचारी कामावर असतील आणि 20 टक्के वर्क फ्रॉम होम तत्त्वावरच काम करत असतील. एप्रिलमध्ये गोपिनाथन यांनी सांगितल्याप्रमाणेच कंपनीने अंमलबजावणी केली असून, अधिकाधिक कर्मचाऱ्यांना कामावर बोलावलं आहे. त्यामुळे कंपनीच्या सुमारे लाखभर कर्मचाऱ्यांना आता वर्क फ्रॉम होम सुविधा उपलब्ध नाही. दरम्यान, TCS मधून कर्मचारी सोडून जाण्याचं प्रमाण (Attrition) जानेवारी ते एप्रिल 2022 या तिमाहीत 17.4 टक्के होतं. ते आताच्या तिमाहीत 19.7 टक्के झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.