आग्रा, 14 मार्च: देशात भारतीय जनता पक्षाची (BJP) सत्ता स्थापन झाल्यापासून देशातील विविध ऐतिहासिक वास्तू आणि शहरांच्या नामकरणाचा सपाटाच लावला आहे. दोनच दिवसांपूर्वी आग्रातील ताज महाल परिसरात हिंदू महासभेच्या (Hindu Mahasabha Activists) काही कार्यकर्त्यांनी येथील लोकांना प्रार्थना म्हणायला लावली होती. याप्रकरणात त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. हे प्रकरण ताजं असताना भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारानं (BJP MLA Surendra singh Clamis) खळबळजनक दावा केला आहे. लवकरत ताज महालाचं नामकरण राम महाल करण्यात (Taj Mahal will be renamed as Ram Mahal) येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित भाजपच्या आमदाराचं नाव सुरेंद्र सिंह असून ते उत्तर प्रदेशातील बैरिया मतदार संघातून भाजपचे निर्वाचित आमदार आहे. शनिवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी यावेळी म्हटलं की, ताज महाल ही वास्तू पूर्वी शंकराचं मंदिर होतं. त्यामुळे लवकरचं ताज महालाचं नामकरण राम महाल करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळातचं हे नामकरण केलं जाईल, असा दावाही सुरेंद्र सिंह यांनी केला आहे. यावेळी सुरेंद्र सिंह यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुला छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. यावेळी ते म्हणाले की, “शिवाजीचे वंशज उत्तर प्रदेशच्या भूमीत अवतरले आहेत. समर्थ गुरु रामदासांनी ज्याप्रमाणे भारताला शिवाजी दिला, त्याचप्रमाणे गोरखनाथजींनी योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशला दिलं आहे.” ताज महालचं नामकरण कृष्णा महाल किंवा राम महाल करावं, अशी मागणी अलीकडेच सुरेंद्र सिंह यांनी केली होती. यानंतर त्यांनी पून्हा एकदा याचीच री ओढली आहे. हे ही वाचा - पिवळा पडतोय ‘ताज’,आता धुक्याचाही बसला वेढा ! अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य करण्याची भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांची ही पहिलीच वेळ नाही. तर याआधीही त्यांनी हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे चांगलाच वाद रंगला होता. तेव्हा सुरेंद्र सिंह म्हणाले होते की, ‘मुलींवर चांगले संस्कार केले, तर देशात बलात्कार होणार नाहीत.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.