जयपूर, 3 जानेवारी : झारखंडमधील जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरला पर्यटन स्थळ बनविण्यास विरोध करणाऱ्या जैन भिक्षू सुज्ञेयसागर महाराज यांनी मंगळवारी आपल्या प्राणाची आहुती दिली. झारखंड सरकारच्या निर्णयाविरोधात ते गेल्या 10 दिवसांपासून उपोषण करत होते. ते 72 वर्षांचे होते. सुज्ञेयसागर 25 डिसेंबरपासून सांगानेर येथे आमरण उपोषणाला बसले होते. मंगळवारी सकाळी सांगानेर संघजी मंदिरापासून त्यांची डोल यात्रा काढण्यात आली. यावेळी आचार्य सुनील सागर यांच्यासह जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयपूरमधील सांगानेर येथे जैन साधूला समाधी देण्यात आली.
झारखंड सरकारने गिरिडीह जिल्ह्यातील पारसनाथ टेकडीला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. याविरोधात जैन समाजाचे लोक देशभरात निदर्शने करत आहेत. पारसनाथ टेकडी समेद शिखर म्हणून प्रसिद्ध आहे, जगभरातील जैनांमध्ये हे सर्वोच्च तीर्थक्षेत्र आहे.
दुसरे जैन ऋषी समर्थ सागर यांनीच्याकडूनही अन्नत्याग
ऑल इंडिया जैन बँकर्स फोरमचे अध्यक्ष भागचंद्र जैन यांनी सांगितले की, मुनीश्रींनी समेद शिखरला वाचवण्यासाठी बलिदान दिले आहे. ते त्याच्याशी संलग्न होते. जैन साधू सुनील सागर म्हणाले की, समेद शिखर हा आमचा अभिमान आहे. आज 6 वाजता मुनी सुज्ञेय सागर महाराज यांचे निधन झाले. समेद शिखर हे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्याचे समजताच ते याच्या निषेधार्थ उपोषणाला बसले होते. राजस्थानच्या या भूमीवर त्यांनी स्वतःला धर्मापुढे झोकून दिले आहे. आता मुनी समर्थ सागर यांनीही अन्नत्याग करून तीर्थक्षेत्र वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मुनी यांचा जन्म जोधपूरच्या बिलदा येथे झाला. मात्र, त्यांचे कर्मभूमी मुंबईतील अंधेरी होती. गिरनार येथील आचार्य सुनील सागर महाराज यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली होती. बांसवाडा येथे मुनी दीक्षा आणि समेद शिखर येथे क्षुल्लक दीक्षा घेतली होती. मुनींनी सुरुवातीपासून व्रताचे पालन केले आणि शेवटी तीर्थस्थळ वाचवण्यासाठी व्रत ठेवले. संताचे घरगुती नाव नेमीराज होते.
का होतोय विरोध?
समेद शिखराच्या आजूबाजूच्या परिसरात मांस आणि अल्कोहोलची विक्री आणि खरेदी करण्यास मनाई आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा दारू पिण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर वाद सुरू झाला. पर्यटन स्थळ घोषित झाल्यानंतर जैन धर्म न मानणाऱ्या लोकांची येथे गर्दी वाढली असल्याचे या मंदिराशी संबंधित लोकांचे मत आहे. मांस आणि दारूचे सेवन करणारे लोक येथे येऊ लागल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
2019 मध्ये इको-सेन्सिटिव्ह झोन
2019 मध्ये केंद्र सरकारने समेद शिखरला इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केले. यानंतर झारखंड सरकारने जिल्हा प्रशासनाच्या शिफारशीवरून त्याला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याचा ठराव जारी केला.
समेद शिखराचे महत्त्व
झारखंडचा हिमालय मानल्या जाणार्या या ठिकाणी जैनांचे पवित्र तीर्थक्षेत्र शिखरजींची स्थापना केली आहे. या पवित्र परिसरात जैन धर्मातील 24 पैकी 20 तीर्थंकरांना मोक्ष प्राप्त झाला. भगवान पार्श्वनाथ, 23 वे तीर्थंकर यांनी देखील येथे निर्वाण प्राप्त केले. पवित्र पर्वताच्या शिखरावर जाण्यासाठी भाविक पायी किंवा डोलीने जातात. जंगल आणि पर्वतांच्या दुर्गम वाटांमधून ते शिखरावर पोहोचण्यासाठी नऊ किलोमीटरचा प्रवास करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jharkhand