रस्त्याच्या एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर. दरी, नदी असो, डोंगर असो, सगळीकडे बर्फच पसरलेला आहे. रस्त्यावर जाड बर्फाची चादर परसत आहे. हे फोटो भारत-चीन सीमेवरील शेवटचं गाव असलेल्या गमशालीचे आहेत. आता तिथे लष्कराची वाहनं येणं कठीण झालं आहे.
भारत-चीन सीमेला जोडणाऱ्या रस्त्यावर एवढा बर्फ पडला आहे, की लष्कराची मोठी वाहनंही सीमाभागात जाऊ शकत नाहीत. बर्फाच्या जाड चादरीमुळे संपूर्ण रस्ता दगडासारखा कठीण झाला आहे, तो साफ करण्यात बीआरओ कर्मचारी आणि अधिकारी हतबल झालेले आहेत.
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या रस्त्यावरील बर्फाचा जाड थर हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र मशिनच्या साहाय्यानेही तो काढणं कठीण होत आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या हिमवृष्टीनंतर सातत्याने थंडी पडत आहे. त्यामुळे सीमेचं रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांनाही त्याचा सामना करावा लागत आहे.