नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' मधून देशाला संबोधित केलं आहे. त्यांचा हा 83 वा कार्यक्रम होता. या कार्यक्रमातून नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. यावेळी त्यांनी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई आणि ऑस्ट्रेलियातून खास कनेक्शन देखील उलगडून सांगितलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमात म्हटलं की, स्वातंत्र्यलढ्यात झाशी आणि बुंदेलखंडचं योगदान आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. राणी लक्ष्मीबाई, झलकारीबाई यांसारख्या विरांगनाही येथे घडल्या आहेत. या भूमीनं मेजर ध्यानचंद यांच्यासारखी क्रिडारत्नेही या देशाला दिली आहेत. ऑस्ट्रेलिया आणि झाशीच्या राणीचं एक वेगळं नातं असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.
त्यासाठी पंतप्रधानांनी एक इतिहासातला एक रंजक किस्सा सांगितला आहे. त्यांनी म्हटलं की, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध कायदेशीर लढा देत होत्या. तेव्हा त्यांचे वकील जॉन लँग हे होते. जॉन लँग मूळचे ऑस्ट्रेलियाचे रहिवासी होते. पण भारतात राहून त्यांनी राणी लक्ष्मीबाईंचा खटला लढवला होता. इतिहासातील आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि आपल्या बुंदेलखंडच्या झाशीचेही एक वेगळं नातं आहे, असं ते म्हणाले.
हेही वाचा-'पोलिसांमध्ये आमचे खबरी...' गौतम गंभीरला तिसऱ्यांदा मिळाली जीवे मारण्याची धमकी!
यावेळी नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील 'सॅक्रेड इंडिया गॅलरी'चा देखील उल्लेख केला आहे. याबाबत सांगताना मोदी म्हणाले की, पर्थमध्ये स्वान नावाची एक सुंदर दरी आहे. या निसर्गरम्य परिसरात हे संबंधित कलादालन तयार करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियातील रहिवासी असणाऱ्या जगत तारिणी दासी यांनी ऑस्ट्रेलियात स्वत:चं वृंदावन निर्माण केलं आहे. जगत तारिणी यांनी आपल्या आयुष्याची 13 वर्षे वृंदावनात घालवली आहेत. याठिकाणी वास्तव्य केल्यानंतर त्या कायमच्या वृंदावनच्या झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियात परत गेल्यानंतर देखील त्या वृंदावनला विसरू शकल्या नाहीत. त्यांनी याठिकाणी 'सॅक्रेड इंडिया गॅलरी' स्थापित केली आहे. याठिकाणी त्यांनी अनेक प्रकारच्या ऐतिहासिक वस्तू जमा केल्या आहेत.
हेही वाचा-स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नातेवाईकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात 18 जणांचा मृत्यू
यावेळी नरेंद्र मोदी यांनी 'अमृत महोत्सवा'बाबात विशेष उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटलं की, अमृत महोत्सवासारखा उपक्रम शिकण्यासोबतच देशासाठी काहीतरी करण्याचीही प्रेरणा देतो. देशभरातील सामान्य जनतेपासून सरकारपर्यंत आणि पंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र अमृत महोत्सवाचाच गाजावाजा सुरू आहे, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच
डिसेंबर महिन्यात नौदल दिवस आणि सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करतो. येत्या 16 डिसेंबरला देश 1971 च्या युद्धाचे स्वर्ण जयंती वर्ष साजरे करत आहोत. यानिमित्त मोदींनी देशाच्या वीरांचे स्मरण करत त्यांना जन्म देणाऱ्या वीर मातांचं अभिवादन केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mann ki baat, Narendra modi