• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • निवडणुकीतील पराभवानंतर पार पडली काँग्रेसची बैठक, पक्षात मोठ्या बदलाचे दिले संकेत

निवडणुकीतील पराभवानंतर पार पडली काँग्रेसची बैठक, पक्षात मोठ्या बदलाचे दिले संकेत

सोनिया गांधी (Sonia Gandhi) म्हणाल्या, निवडणुकीचे निकाल (Assembly Election 2021) पाहिल्यानंतर हे स्पष्ट झालं आहे, की पक्षात बदल करणं आवश्यक आहे. त्या म्हणाल्या, की आपण या गंभीर धक्क्याची दखल घेणं गरजेचं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 10 मे : काँग्रेसच्या (Congress) कार्यकारी समितीच्या (CWC) बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी नुकत्याच पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील (Assembly Election 2021) पक्षाच्या कामगिरीवर चिंता व्यक्त केली. सोनिया गांधी म्हणाल्या, निवडणुकीचे निकाल पाहिल्यानंतर हे स्पष्ट झालं आहे, की पक्षात बदल करणं आवश्यक आहे. त्या म्हणाल्या, की आपण या गंभीर धक्क्याची दखल घेणं गरजेचं आहे. निवडणूकीचे निकाल पाहिल्यानंतर मला वाटलं, की आता आपण प्रत्येक गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे, असंही त्या म्हणाल्या. सोनिया गांधी सभेत म्हणाल्या, की कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकार अपयशी ठरलं आहे. अशा नाजूक वेळी त्यांनी पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलविण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. कोरोनाला एक मोठं आरोग्य संकट म्हणून संबोधित करताना सोनिया गांधी यांनी सर्व कार्यकर्त्यांना लोकांच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं. सोनिया गांधी यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या अपयशाचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्याविषयी निर्णय घेतला आहे. आसाम आणि केरळमधील पराभव तसंच पश्चिम बंगालमध्ये पक्षाला मिळालेल्या शून्य जागा अत्यंत निराशाजनक असल्याचं त्यांनी म्हटलं. जूनअखेरीस होणाऱ्या काँग्रेस अध्यक्षाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक तयार करण्याबाबतची माहितीही त्यांनी दिली. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी, गुलाम नबी आझाद, पी चिदंबरम, आनंद शर्मा यांच्यासह सीडब्ल्यूसीचे इतर सदस्य या बैठकीला हजर होते. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्य आणि केंद्र शासित प्रदेशाच्या निवडणूकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. आसाम आणि केरळमध्ये सत्तेत परतण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला मोठी हार पत्कारावी लागली आहे. पश्चिम बंगालमध्ये आपलं खातं खोलणंही काँग्रेसला शक्य झालं नाही. पुद्दुचेरीमध्ये गेल्या काही महिन्यांपर्यंत सत्तेत असतानाही काँग्रेसला आपली जागा टिकवता आली नाही. तमिळनाडूमध्ये काँग्रेससाठी दिलासादायक बाब म्हणजे द्रमुकसोबतच्या त्यांच्या गठबंधनाला विजय मिळाला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: