लखनऊ 24 डिसेंबर : उत्तर सिक्कीममधल्या झेमा इथं ट्रक दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 16 लष्करी जवानांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या जवानांमध्ये तीन ज्युनिअर कमिशन्ड अधिकाऱ्यांचाही (जेसीओ) समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह विविध क्षेत्रांतल्या व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे. मृत्यू झालेल्या 16 जवानांपैकी एक जवान उत्तर प्रदेशातल्या ललितपूर जिल्ह्यातल्या सौजाना गावचा रहिवासी आहे. चरणसिंह असं त्या हुतात्मा जवानाचं नाव आहे. जवान हुतात्मा झाल्याची माहिती मिळताच ललितपूरमध्ये शोककळा पसरली आहे. चरण सिंह यांच्या कुटुंबीयांना या अपघाताची माहिती मिळाली, त्यावेळी ते त्यांच्या मुला-मुलीच्या वाढदिवसाच्या तयारीत व्यग्र होते. ही जुळी मुलं आहेत. 20 दिवसांपूर्वीच चरणसिंह आपली रजा संपवून ड्युटीवर गेले होते. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. जवानांनी भरलेला ट्रक, तीव्र टर्न, अन्… अपघाताचे धक्कादायक PHOTO आले समोर सौजानामधल्या ठकरसपुरा मोहल्ल्यातले हुकुमसिंह यांचे पुत्र चरणसिंह (वय 35) यांची 2004मध्ये सैन्यात निवड झाली होती. तेव्हापासून ते देशासाठी सेवा देत होते. शुक्रवारी (23 डिसेंबर) चरणसिंह यांची तीन वर्षांची जुळी मुलं सुखसिंह आणि नव्या यांचा वाढदिवस होता. त्यामुळे चरणसिंह यांनी सकाळी फोन करून मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. संध्याकाळी जेव्हा मुलं केक कापण्याच्या तयारीत होती, त्याच वेळी सिक्कीममधल्या युनिटच्या अधिकाऱ्यांचा चरणसिंह यांच्या घरी फोन आला. चरणसिंह यांचे मोठे बंधू ब्रिजपालसिंह यांना आपल्या भावाचं दुःखद निधन झाल्याची माहिती मिळाली. ही माहिती सर्वांना समजताच घरात दुःखाचं वातावरण पसरलं. चरणसिंह ऑक्टोबर महिन्यामध्ये एका महिन्याच्या रजेसाठी घरी आले होते. त्यांनी आपली रजा आणखी एक महिना वाढवून घेतली होती. त्यामुळे आपली दोन महिन्यांची रजा संपवून 3 डिसेंबर रोजी चरणसिंह ड्युटीवर गेले होते. BIG News : भीषण अपघातात 16 भारतीय जवानांचा मृत्यू; आर्मी ट्रकचा अक्षरश: चुराडा झाला हुतात्मा चरणसिंह यांचे मोठे बंधू ब्रिजपालसिंह यांनी सांगितलं, की तीन भावांमध्ये चरणसिंह सर्वांत लहान होते. त्यांना जुळी मुलं आहेत. वडील शेती करतात. चरण आर्मीमध्ये हवालदार म्हणून तैनात होते. सौजनाचे एसएचओ संदीप सेंगर यांनी सांगितलं, की संध्याकाळी जेव्हा त्यांना माहिती मिळाली, तेव्हा ते हुतात्मा जवानाच्या घरी गेले. तिथे त्यांनी कुटुंबीयांची भेट घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.