लखनऊ, 12 जुलै : उत्तर प्रदेशमधील (
Uttar Pradesh) गाझियाबादमध्ये (
Gaziabad) एक आव्हानात्मक डिलिव्हरी डॉक्टरांनी यशस्वी केली. IVF तंत्रज्ञानाने गर्भवती राहिलेल्या एका महिलेनं एकाच वेळी 4 मुलांना (
4 babies) जन्म दिला. यात 3 मुलं आणि एका मुलीचा समावेश असून आईसह चारही बाळांची प्रकृती उत्तम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
आव्हानात्मक ऑपरेशन
गाझियाबादच्या नेहरूनगरमधील यशोदा हॉस्पिटलमध्ये हे ऑपरेशन करण्यात आलं. या हॉस्पिटलमध्ये झालेलं अशा प्रकारचं हे पहिलंच ऑपरेशन असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पहिल्यापासून योग्य नियोजन, औषधोपचार आणि आहारामुळे ही अवघड शस्त्रक्रिया पार पडल्याचं सांगितलं जात आहे.
लोकसंख्या कायदा आणि चार मुलं
या चार बाळांचा जन्म होण्याअगोदर एक दिवस उत्तर प्रदेश सरकारनं आपलं नवं लोकसंख्या नियंत्रण धोरण जाहीर केलं. यासाठीचा मसुदा तयार करण्यात आला असून लोकसंख्येला नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. या प्रस्तावित कायद्यानुसार दोनपेक्षा जास्त अपत्यं असणाऱ्यांना अनेक लाभांपासून वंचित ठेवण्याची तरतूद आहे. असं असताना आता या चार बाळांच्या पालकांना पण कायदा लागू होणार का, या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला.
कायदा काय सांगतो?
उत्तर प्रदेश राज्य सरकारनं तयार केलेल्या मसुद्यात दोनपेक्षा अधिक मुलं असणाऱ्यांना सरकारी नोकरी न मिळणं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न लढता येणं आणि कुठल्याही सरकारी योजनांचा लाभ न मिळणं, अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत. मात्र जुळ्या मुलांसाठी वेगळी तरतूदही कायद्यात आहे. दोन मुलांचा नियम हा जुळ्या मुलांना लागू होत नसल्याची ही तरतूद अनेक सर्वसामान्यांना माहिती नसल्यामुळेच असा प्रश्न पडत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
हे वाचा -
साहेब, आम्हाला वाचवा! वीज कोसळून जखमी झालेल्या नागरिकाचा पोलिसांना फोन
या मसुद्याचं अजून कायद्यात रुपांतर व्हायचं आहे. विधिमंडळ अधिवेशनानंतर या कायद्याचं भवितव्य ठरेल. मात्र काहीही झालं तरी जुळ्यांबाबतची तरतूद ही कायम राहणार असल्यामुळे या चार चिमुकल्यांच्या पालकांना चिंता करण्याचं कारण नसल्याचं स्पष्ट झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.