नवी दिल्ली 26 मार्च : फाटलेल्या जिन्सबाबत विधान करणारे उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरश सिंह रावत (Tirath Singh Rawat) या विधानामुळे भलतेच चर्चेत आले. त्यांच्या या विधानावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या तर अनेकांनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं. अशात आता यावर केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani on Ripped Jeans) यांची प्रतिक्रिया आली आहे. स्मृती इराणीदेखील या विधानावरुन तीरथ सिंह यांच्यावर भडकल्या आहेत.
काय म्हणाल्या स्मृती इराणी -
स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या रिप्ड जिन्सबाबतच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, की लोकांनी कशाप्रकराचे कपडे घालावेत याच्यासोबत नेत्यांचं काही घेणं देणं नाही. कारण त्यांचं काम धोरण बनविणे आणि कायद्याचे राज्य सुनिश्चित करणे हे आहे. पुढे बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या, की काही गोष्टी पवित्र आहेत आणि त्यातीलच एक आहे महिलांनी आपलं जीवन जगण्याची पद्धत निवडणं आणि समाजासोबत जोडण्यासाठी ती जो प्रकार निवडेल तो पवित्रच आहे. नेत्यांचा या गोष्टीसोबत काहीही संबंध नाही की लोक कसे कपडे घालतात. काय खातात किंवा काय करतात. आपलं काम धोरण बनवणं आणि कायद्याचं शासन सुनिश्चित करणं आहे. अनेक नेते चुकीचे वक्तव्य करत असतात, असंही त्या म्हणाल्या.
काय म्हणाले होते तीरथ सिंह रावत -
तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते, की मी एकदा विमानानं प्रवास करत होतो. तेव्हा एक महिला माझ्या बाजूला बसली होती. जेव्हा मी त्या महिलेकडे पाहिलं तेव्हा तिची जीन्स गुडघ्यावर फाटलेली होती. ही महिला एनजीओ चालवत होती. फाटलेली जीन्स घालणारी महिला संस्कृतीला कसा जन्म देईल आणि मुलांना काय संस्कार देईल, असं त्यांनी म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smriti irani, Tirath singh rawat