हाथरस, 17 जुलै : आई-वडिलांना कावडीमधून काशीला घेऊन जाणारा श्रावणबाळ सगळ्यांनाच माहीत असेल. असा श्रावणबाळ पुन्हा होणार नाही असंही अनेकांना वाटत असेल; मात्र उत्तर प्रदेशातल्या हाथरस जिल्ह्यात असे 3 श्रावणबाळ आपल्या आई-वडिलांना घेऊन देवदर्शनाला गेले आहेत. खांद्यावर कावड घेऊन, त्यात आई-वडिलांना बसवून या 3 भावांनी तब्बल 150 किलोमीटरचा प्रवास केला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिना पवित्र समजला जातो. या महिन्यात व्रतवैकल्यं केली जातात. उपवास केले जातात, तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या जातात. रस्ते व प्रवासाची साधनं सुधारल्यामुळे आता जवळपास प्रत्येक ठिकाणी भेट देणं शक्य होतं. वयोवृद्ध माणसांनाही ते जमतं; पण जुन्या काळात दळणवळणाची साधनं नव्हती. त्या वेळी कावडीत बसवून पालकांना तीर्थाटन घडवणाऱ्या श्रावण बाळाची गोष्ट अनेकांना माहीत आहे; मात्र सध्याच्या काळातही असा एक नाही तर 3 श्रावणबाळ आहेत, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये 3 मुलं त्यांच्या आई-वडिलांचे ‘श्रावणबाळ’ बनली आहेत. हाथरसच्या हरिनगर कॉलनीमध्ये बदनसिंह बघेल आपली पत्नी अनारदेवी आणि 3 मुलांसोबत राहतात. बदनसिंह नेत्रहीन आहेत. त्यांना अनेक दिवसांपासून गंगास्नान करण्याची इच्छा होती. ती त्यांनी मुलाजवळ बोलून दाखवली. ती पूर्ण करण्यासाठी रमेश, विपिन आणि योगेश या तिन्ही मुलांनी त्यांना रामघाट इथं गंगास्नानासाठी नेलं. गंगास्नान झाल्यावर आपल्या आई-वडिलांना त्यांनी सासनी इथल्या विलेश्वर धाम या मंदिरात दर्शनासाठी नेलं. कावडीमध्ये बसून मंदिरात जाणारे वृद्ध आई-वडील पाहून रस्त्यावर भरपूर गर्दी जमली होती. त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारीही होते. सासनीपर्यंतचं जवळपास 150 किलोमीटर अंतर तिन्ही मुलांनी आई-वडिलांना कावडीमध्ये घेऊन पार केलं. सासनीमध्ये पोहोचण्याआधीच पोलीस तिथे पोहोचले होते. काही काळ पोलीस त्यांच्यासोबत पायी चाललेही. सासनी इथल्या विलेश्वर धाम इथे आज (17 जुलै) त्यांनी आई-वडिलांसोबत भगवान शंकरांना अभिषेक केला. शंकरांना गंगेच्या पाण्यानं हा अभिषेक करण्यात आला. सासनी इथं आई-वडिलांना खांद्यावरून कावडीतून नेताना त्या तिघांच्या पत्नी व मुलंही त्यांच्यासोबत होती. सध्याच्या काळात असं दृश्य दुर्मीळ म्हणावं लागेल; मात्र खऱ्या श्रावणबाळाप्रमाणेच त्या तिघांनीही पालकांची देवदर्शनाची इच्छा पूर्ण केली. हे दृश्य पाहणाऱ्या अनेकांना यावरून श्रावणबाळाची आठवण झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.