ग्वाल्हेर, 13 नोव्हेंबर : मध्य प्रदेशातल्या पोटनिवडणुकांच्या निकालांची धामधूम सुरू होती, तेव्हाची घटना. ग्वाल्हेरमध्ये इलेक्शन बंदोबस्तावर असणारे दोन पोलीस अधिकारी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर परत निघाले होते. रस्त्याच्या कडेला थंडीने कुडकुडत असलेला एक भिकारी दिसला. पोलिसांनी गाडी थांबवायला सांगितली. त्या भिकाऱ्यापाशी जाऊन चौकशी केली. त्याला अंगावर घालायला जॅकेट दिलं, बूट दिले. केस पिंजारलेले, फाटके कपडे, अत्यंत मळकट कळकट अवस्था, दाढी वाढलेली यावरून हा भिकारी मनोरुग्ण असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पण यापूर्वी या माणसाला कुठेतरी पाहिल्यासाखंही वाटत होतं. चौकशीअंती उलगडा झाला तेव्हा या पोलीस उपअधीक्षकांना मोठा धक्का बसला. हा भिकारी दुसरा तिसरा कुणी नसून आपल्याच बॅचचा पोलीस ऑफिसर असल्याचं त्यांना आठवलं.. वाचा सविस्तर नेमकं काय घडलं? मध्ये प्रदेशात ग्वाल्हेरची ही घटना. आज तकने याविषयी बातमी दिली आहे. मतमोजणीच्या दिवशी बंदोबस्तावर असणारे DSP रत्नेश तोमर आणि विजय भदौरिया यांना रस्त्यात हा भिकारी फुटपाथवर पडलेला दिसला. अत्यंत वाईट अवस्थेत, थंडीने कुडकुडणाऱ्या या मध्यमवयीन व्यक्तीला पाहून त्यांनी गाडी थांबवलायला सांगितलं. दोघेही पोलीस उपअधीक्षक खाली उतरले. त्याला खायला दिलं. पांघरायला जॅकेट दिलं आणि बूटही दिले. पण चेहरा ओळखीचा वाटल्याने त्यांनी त्या भिकाऱ्याची आणखी चौकशी केली. तो अर्धवट उत्तरं देत होता. पण त्यानंतर धक्का बसायची वेळ पोलीस अधिकाऱ्यांची होती. हा भिकारी म्हणून समोर आलेला आपलाच एकेकाळचा बॅचमेट होता, हे त्यांच्या लक्षात आलं. मनीष मिश्रा असं या निराधार मनोरुग्ण व्यक्तीचं नाव. ते गेली 10 वर्षं अशाच अवस्थेत हिंडत आहेत. 1999 सालच्या बॅचचे ते पोलीस अधिकारी होते आणि त्या वेळी अचूक नेम साधणारा निशाणेबाज म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी मध्य प्रदेशात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी म्हणून काम केलं. पण 2005 च्या सुमारास त्यांना मानसिक त्रास सुरू झाला. या आजाराने त्यांची मानसिक स्थिती बिघडली. त्यांचं लग्न झालेलं होतं. पत्नी आणि इतर नातेवाईकही चिंताग्रस्त झाले. त्यांनी उपचारासाठी मनीष मिश्रा यांना मनोरुग्णालयात दाखल केलं. पण तिथून ते पळून गेले. त्यानंतर जिथे जिथे त्यांना अॅडमिट केलं गेलं, तिथून त्यांनी पलायन केलं. त्यांच्यावर योग्य उपचार होऊच शकले नाहीत आणि मानसिक स्थिती बिघडत गेली. दरम्यान या सगळ्याला कंटाळून पत्नीही सोडून गेली. पुढे तिने घटस्फोटही घेतला. मिश्रांची नोकरी गेली आणि अवस्था दयनीय होत गेली. नातेवाईकांनीही त्यांचा नाद सोडून दिला. खरं तर मिश्रा यांचे वडीलही पोलीस दलात होते आणि भाऊसुद्धा अधिकारी आहे. याशिवाय त्यांची एक नातेवाईक तर परराष्ट्र खात्यात उच्चपदस्थ असल्याचं समजतं. शेवटी मिश्रांवर भीक मागण्याची वेळ आली. ते गेली काही वर्षं असं फूटपाथवर भिकाऱ्याचं आयुष्य जगत असल्याचं पाहून त्यांचे एकेकाळचे सहकारी असलेले DSP तोमर आणि DSP भदौरिया यांना मोठाच धक्का बसला. त्यांनी मिश्रांना एका स्वयंसेवी संस्थेत दाखल केलं आणि त्यांच्यावरचे उपचार सुरू केले. आपल्याबरोबर चला असंही या दोघांनी आपल्या एके काळच्या दोस्ताला सांगितलं. पण मिश्रांनी ते मान्य केलं नाही. सध्या एका मनोरुग्णांच्या संस्थेत मिश्रांना दाखल करण्यात आलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण या घटनेवरून कुणावर कधी कुठली वेळ येईल सांगता येत नाही, हेच जीवनाचं वास्तव समोर येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.