नवी दिल्ली, 29 मे : केंद्रीय मंत्रिमंडळ रचनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची बैठक सुरू झाली आहे. शिवसेनेला दोन कॅबिनेट मंत्रिपदं तर एक राज्यमंत्रिपद देण्यावर या बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. एनडीएला मिळालेल्या घवघवीत यशात शिवसेनेचाही मोठा वाटा आहे. त्यामुळेच मंत्रिपदासह लोकसभेचे उपसभापती पदही शिवसेनेला दिलं जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यातील बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. शिवसेनेकडून विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मुंबई अशा सर्व विभागांना प्रतिनिधित्व देण्यासाठी या भागातील खासदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेच्या वतीने अनिल देसाई, विनायक राऊत, भावना गवळी यांची नावं आघाडीवर आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत जनतेनं पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या पारड्यात आपलं मत टाकलं. या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं. तर, NDAचं संख्याबळ हे 350च्या घरात गेलं. 30 मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात कोण असणार? मित्र पक्षांना किती जागा असणार? यावर चर्चा सुरू झाली आहे. विशेषता जुना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला 2014मध्ये अवघं एक मंत्रिपद मिळालं होतं. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात आणखी एक पद शिवसेनेला देण्यात येणार होतं. पण, मातोश्रीवरून गेलेल्या फोननंतर अनिल देसाई यांना विमानतळावरून माघारी परतावं लागलं होतं. शिवसेनेनं वेळोवेळी आपली नाराजी उघड केली होती. राज्यात देखील दोन्ही पक्षांमध्ये सतत खटके उडत होते. पण, भाजपनं बदलत्या राजकीय स्थितीचा अंदाज घेत शिवसेनेशी जुळवून घेतलं. पण, NDA-2मध्ये शिवसेनेला किती मंत्रिपदं मिळणार हे पाहावं लागणार आहे. VIDEO: भाजप प्रवेशाच्या चर्चेवर अखेर धनंजय महाडिकांनी दिलं उत्तर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







