मुंबई, 15 जून : राम मंदिर उभारणीचा अजेंडा घेऊन उद्धव ठाकरे उद्या म्हणजे 16 जूनला अयोध्येला जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालीच अयोध्येमध्ये राम मंदिराची उभारणी होईल आणि आमच्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच सुप्रीम कोर्ट आहेत, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत आजच अयोध्येत पोहोचले आहेत. उद्धव ठाकरे रविवारी सकाळी 9 वाजता अयोध्येत पोहोचतील. एअरपोर्टहून ते लगेचच रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे नवे 18 खासदारही असतील.
VIDEO : उदयनराजे भडकले, म्हणाले पिसाळलेल्यांना आधी आवरा
राम मंदिर हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही तर आस्थेचा विषय आहे, असं संजय राऊत म्हणाले. राम मंदिराबद्दल भाजप पुढची रूपरेखा ठरवेल. कारण शिवसेना हा एनडीएचा एक घटकपक्ष आहे, असं संजय राऊत म्हणाले.
बहुमत हे राम मंदिरासाठीच
राम मंदिराबद्दल सरकारला आठवण करून देण्याची गरज नाही. 2020 मध्ये राज्यसभेत बहुमत मिळेल. 2019 चं बहुमत राम मंदिरासाठी मिळालं आहे. त्यामुळे पुढची निवडणूक राम मंदिराच्या मुद्द्यावर लढावी लागणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
याआधी उद्धव ठाकरेंनी 25 नोव्हेंबर 2018 ला अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेतलं होतं. राम मंदिराबद्दल सरकारवर दबाव आणण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला होता. रामलल्लांचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, सगळ्यांचे आभार. संतांचे आभार. संतांच्या आशिर्वादाशिवाय कोणतंही काम होऊ शकत नाही. देशातलेच नाही तर परदेशातले हिंदूही राम मंदिराची वाट बघत आहेत.
मध्यस्थांची समिती
राम मंदिराच्या वादावर तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने तीन मध्यस्थांची एक समिती नेमली आहे. या वादावर परस्पर सामंजस्याने तोडगा काढावा, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे.
===================================================================================
SPECIAL REPORT: लोकसभेनंतर उद्धव ठाकरेंचं आधी सरकार फिर 'राम मंदिर'