मुंबई, 11 मे : शिक्षण अथवा कामासाठी घराबाहेर एखाद्या पीजीमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये राहण्याचा अनुभव खूप भारी असतो. प्रत्येकाने एकदा तरी हा अनुभव घ्यावा असं म्हणतात. तो तुम्हाला अनुभवसंपन्न तर बनवतोच शिवाय ह्रदयाशी जोडणारी नाती मिळवून देतो. सध्या देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यानिमित्ताने हॉस्टेल वा पीजीमधील (#PGStory) आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न.
ही कहाणी आहे 28 वर्षीय मौलश्रीची. ती 2015 मध्ये पुण्याहून दिल्लीला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आली होती. त्यानंतर पुढील तीन वर्षांत मौलश्रीने 5 नोकऱ्या आणि 5 घरं बदलली. आज ती एका मीडिया कंपनीत काम करते.
नोकरी मिळविण्यासाठी पुण्यात एक वर्ष उलटलं होतं. त्यामुळे आता देशातील इतर तरुणींप्रमाणे मलाही दिल्लीचं वेड लागलं होतं. अवघ्या 3 दिवसात मी दिल्लीला जाण्याचा निर्णय नक्की केला. एकच बॅग होती, ती उचलली आहे दिल्लीला रवाना झाले. पण दिल्लीने जे काही अनुभव दिले, ते आयुष्यभर विसरणार नाही, हे नक्की.
दिल्ली पोहोचल्यानंतर आधी राहण्याची सोय करायची होती. अख्ख दिल्ली पालथं घातलं. साऊथ ते नॉर्थ...उत्तम नगर ते मालवीय नगर...मात्र मला राहण्याची जागा काही सापडत नव्हती. इथे इतकं सोपं नाही हे लक्षात आलं. आता एक शेवटचा पर्याय उरला होता. येथे तरी मला जागा मिळेल, ही आशाच संपून गेली होती. शेवटी त्या पाच मजली इमारतीच्या बाहेर उभी राहून मी इथे का आले या विचाराने मी स्वत:ला दूषणे देऊ लागले.
सुदैवाने मला त्या पीजीत जागा मिळली. फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या कुटुंबीतील काकूंनी मला सर्वांची ओळख करुन दिली. मी आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझी रुम शेअर करण्यासाठी एक मुलगी आली. चौथ्या माळ्यावर चार मोठ मोठे बॅग्स चढवत असताना तिला पाहिलं. मी मदतीसाठी विचारलं पण तिने मोठी स्माईल करीत नकार दिला. तिचं वय साधारण 30 ते 35 मधील होतं. शिवाय तिचं लग्नही झालं होतं.
मी काही विचारायच्या आत ती सुरू झाली. तिचं नाव पूजा होतं. तीन वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं होतं. तिचा नवरा परदेशात गेल्या कारणाने ती या पीजीमध्ये राहायला आली होती. सासरच्यांसोबत फार पटत नाही. लग्नापूर्वी ती या पीजीमध्ये राहत होती. त्यामुळे या पीजीच्या काकींसोबत तिचं चांगलं पटत होतं. दहा मिनिटांत तिने अख्खं आयुष्य मला सांगितलं.
एक दिवशी मी तयार होत होते. तेव्हा पूजा म्हणाली की मला ताई म्हणता जा..माझी लहान बहीण तुझ्यासारखीच दिसते. त्यानंतर आमचं चांगलं पटू लागलं. चांगली रुममेट मिळाल्याचा आनंद मलाही होताच. ती पूर्ण दिवस घरात राहायची. नोकरी करत नव्हती. मी दिल्लीत थिएटर जॉइन केलं होतं. पूजा अनेकदा माझ्या खाण्याचीही काळजी घेत होती.
एक दिवशी तिने सांगितलं की लग्नाच्या इतक्या दिवसात तिने पतीसोबत कधी शारिरीकसंबंध ठेवले नाही. पती जवळ येताच ती घाबरुन जायची. यामुळे पतीपण चिडचिड करीत होता आणि म्हणे त्याचे विवाहबाह्य संबंधही होते.
हळूहळू तिच्या वागण्यात बदल होत होता. ती माझ्यावर खूप चिडायची...मला ओरडायची...तिची बहीण आमच्या पीजीच्या जवळच्या पीजीत राहत होती. मात्र तेथे जागा नसल्याचे पूजाने सांगितले होते. ती नेहमी म्हणायची..माझी बहीण खूप स्मार्ट आहे. तिचं राहणं-बोलणं एकदम माझ्यासारखं असल्याचं ती वारंवार मला सांगायची. त्यावेळी तिच्या डोळ्यात बहिणीविषयी राग होता. त्यावरुन दोन्ही बहिणींमध्ये स्पर्धात असल्याचं मला वाटलं. मात्र कालातंराने तिचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत होता. ती माझ्यावर अधिक रागावायची. पीजीच्या काकूंना माझ्याबद्दल काहीही तक्रार करायची.
एक दिवशी ती माझ्या बेडजवळ उभी राहून माझ्याकडे रागाने बघत होती. मी घाबरले. त्यानंतर मी खोलीत टिव्ही बघत होते आणि गॅसवर भेंडीची भाजी ठेवली होती. तेच पूजा स्वयंपाक घरात आली आणि फ्रिज उघडून मी तिचं दुधाचं पॅकेट चोरल्याचा गाजावाजा करू लागली. यापूर्वीही तिने मी अंघोळ करताना बाथरुमचं दार बाहेरुन लावून घेतलं होतं. आता मात्र कहर झाला होता. दुधाचं पॅकेट उघताना ते तिच्या हातून पडलं आणि ती माझ्यावर जोरजोरात ओरडू लागली. तुझ्यासारखी वाईट मुलगी मी आजतागायत पाहिली नाही. तू माझ्या कपाटातून काजू चोरते...माझं सामान चोरते...इतकचं नाही तर माझा पतीही चोरलास...दुसऱ्याच क्षणी पूजाने गॅसवर ठेवलेली भेंडीच्या भाजीची कडई जमिनीवर आपटली. त्यानंतरही तिची बडबड सुरूच होती. छोट्या शहरांमध्ये राहणाऱ्या मुली अशाच असतात. पैसे कमावण्यासाठी तुम्ही कोणत्याही थराला जाऊ शकता....वगैरे वगैरे...मात्र मी तिचा पती चोरला ही गोष्ट माझ्या डोक्यातून जाईना. मी तर तिच्या पतीला ओळखतही नाही.
नंतर या गोष्टीचा खुलासा झाला आणि तो माझ्यासाठी धक्कादायक होता. खरं तर तिचा पती परदेशात गेला नव्हता...त्याचं आणि पूजाच्या लहान बहिणीचं अफेअर होतं. ते कळल्यानंतर तिच्या डोक्यावर काहीसा परिणाम झाला होता. ती नेहमी मला आपल्या लहान बहिणीच्या जागेवर पाहत असे आणि तो राग ती माझ्यावर काढत होती...पूजासोबत घालवलेले ते दिवस मला वेगळ्याच अर्थाने लक्षात राहणारे आहेत. मला माहीत नाही आता पूजा कुठे आहे...मात्र ती यातून बाहेर आली असावी आणि स्वत:साठी सन्मान आणि स्वाभिमानाच्या मार्गाने प्रवास करीत असावी..
हे वाचा -कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने हादरलं केंद्र सरकार, तयार होतोय नवा Action Plan
संपादन - मीनल गांगुर्डे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Delhi