जाहिरात
मराठी बातम्या / देश / सेक्स वर्कर्सना कोणत्याही रहिवासी पुराव्याशिवाय मिळणार आधार कार्ड, UIDAI ने सुप्रीम कोर्टात म्हटलं...

सेक्स वर्कर्सना कोणत्याही रहिवासी पुराव्याशिवाय मिळणार आधार कार्ड, UIDAI ने सुप्रीम कोर्टात म्हटलं...

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

सेक्स वर्कर्सकडे आधार कार्डसाठी इतर कोणत्याही रहिवासी पुराव्याची ( domicile certificate ) किंवा प्रमाणपत्राची मागणी केली जाणार नाही.

    मुंबई, 2 मार्च- युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) सर्वोच्च न्यायालयाला कळवले आहे की, ते राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेने (NACO) जारी केलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे सेक्स वर्कर्सना (Sex Workers) आधार कार्ड (Aadhaar Card) जारी करतील. आधार कार्डसाठी इतर कोणत्याही रहिवासी पुराव्याची ( domicile certificate ) किंवा प्रमाणपत्राची मागणी केली जाणार नाही. यूआयडीएआय हे एक वैधानिक प्राधिकरण आहे, जे अर्जदाराचं नाव, लिंग, वय आणि पत्ता तसंच ईमेल किंवा मोबाईल नंबरसारखा पर्यायी डेटा समाविष्ट करण्यासाठी अनिवार्य तपशील गोळा केल्यानंतर आधार कार्ड जारी करतं. सेक्स वर्कर्सच्या बाबतीत, यूआयडीएआयने रहिवासी पुरावा न मागण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेने किंवा राज्य आरोग्य विभागाच्या राजपत्रित अधिकाऱ्याने (Gazetted officer) सेक्स वर्करला दिलेलं प्रमाणपत्र स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना ही केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा एक विभाग आहे. ही संघटना सेक्स वर्कर्सशी संबंधित केंद्रीय डेटाबेस तयार करून तो साठवून ठेवते. 2011 पासून सुनावणी सुरू- न्यायमूर्ती एल. एन. राव यांच्या कोर्टात संपूर्ण भारतातील सेक्स वर्कर्सना सामाजिक सुरक्षा लाभ मिळवून देण्याच्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना यूआयडीएआयने प्रमाणपत्राचा प्रस्तावित प्रोफॉर्मा (Proposed Proforma) सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवला. वेश्या व्यवसायातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांसाठी पुनर्वसन योजना तयार करण्याच्या मुद्द्याचाही या याचिकेत समावेश आहे. 2011 पासून सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. यूआयडीएआयचे प्रतिज्ञापत्र न्यायालयाच्या 10 जानेवारीच्या आदेशाच्या उत्तरात आले आहे, ज्यात प्राधिकरणाला हे तपासण्यास सांगितले होते की, राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेकडे असलेली माहिती सेक्स वर्कर्सच्या वास्तव्याचा पुरावा मानली जाऊ शकते का? आणि त्या आधारावर त्यांना आधार कार्ड दिलं जाऊ शकतं का ? त्यानुसारच यूआयडीएआयने प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिलं आहे. (हे वाचा: त्याला घरजावई करा आणि…’; नवरा-बायको वादाच्या प्रकरणात कोर्टाचा अजब आदेश ) आजच्या काळात आधार कार्ड हे तुमच्याकडे असलेलं सर्वात महत्त्वपूर्ण ओळखपत्र आहे. इतर कोणत्याही डॉक्युमेंटपेक्षा जसं की मतदान कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, पासपोर्ट या सर्वांपेक्षा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आधार कार्डची गरज अधिक भासते. कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक ठरते. आज सरकारकडून मिळणाऱ्या प्रत्येक सुविधेला आधार कार्ड लिंक करण्यात आले आहे. त्यावरूनच व्यक्तीची ओळख पटवून, तिला संबंधित योजनेचा लाभ दिला जातो. मात्र, रहिवासी पुरावा नसल्यामुळे सेक्स वर्कर्सना आधारकार्ड मिळण्यात अडचणी येत होत्या. पण आता ही अडचण लवकरच दूर होईल, अशी चिन्हे आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात