बारमेर, 10 जुलै : राजस्थानमधील (Rajasthan) बारमेर (Barmer) जिल्ह्यात लहान बाळ चोरून (Child Stolen) नेल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेनंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली. सोशल मीडियातून पोस्ट व्हायरल झाल्या. शेवटी बाळाच्या आईने 'कोणी नेलं असेल, त्याने बाळ परत द्यावं,' असं अत्यंत कळकळीने आवाहन केलं. आईच्या या अश्रूंमुळे चोराचं मन पालटलं आणि त्याने बाळाला निर्मनुष्य रस्त्यावर सोडून दिलं.
सीमावर्ती भागातल्या बारमेरमधलं हे बाळ राज्यभरात चर्चेचा विषय ठरलं होतं. त्या लहान मुलाला रस्त्यावर सोडल्याचं आढळून आलं. आईच्या अश्रूंमुळे कथित चोरांचं मनपरिवर्तन झालं आणि त्यांनी त्या बाळाला सोडून दिलं. हे लहान मूल सापडल्याने पोलिसांनी (Police) सुटकेचा निःश्वास सोडला आणि मूल परत मिळाल्याने आईसह त्याच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपल्या काळजाचा तुकडा परत मिळावा यासाठी ज्या लोकांनी परिश्रम घेतले त्यांचे या बाळाच्या आईने आभार मानले आहेत.
बारमेरमधल्या अलसुबह जिल्हा रुग्णालयातून शुक्रवारी सकाळी (9 जुलै) लहान मूल चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणामुळे संपूर्ण दिवस बारमेर पोलिसांसाठी परीक्षेचा ठरला. बारमेर जिल्ह्यात लहान बाळाची चोरी होण्याचं हे पहिलंच प्रकरण होतं. त्यामुळे हे बाळ पुन्हा मिळणं आणि त्याची सुरक्षा याबाबत चिंतेचं वातावरण होतं. बारमेरचे पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन 6 वेगवेगळी पथकं (Teams) स्थापन करून 100 हून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या लहान बाळाच्या शोधार्थ पाठवलं.
हे ही वाचा-डेल्टा + व्हेरिएंटपेक्षा धोकादायक असलेला 'लॅम्बडा' वाढवणार भारताची चिंता?
त्याच वेळी बारमेरचे आमदार मेवाराम जैन हेदेखील या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून होते. या बाळाचे फोटो आणि माहिती सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून जोरदार व्हायरल झाल्यानंतर आपण अडचणीत येतोय, त्यामुळे बाळाला सोडून देण्यातच आपलं हित आहे, याची जाणीव चोरांना झाली असावी. बाळासाठी दिवसभर रडत असलेल्या आईने एक हृदयस्पर्शी आवाहन केलं आणि आपल्या बाळाला सुखरूप सोडून द्यावं, अशी कळकळीची विनंती केली. यानंतर काही मिनिटांतच बाळ सुखरूप सापडल्याचा निरोप मिळाला आणि आईच्या आनंदाला पारावार उरला नाही.
न्यूज 18चे आभार मानले
आपलं तीन दिवसांच बाळ सुखरूप परत मिळावं, यासाठी न्यूज 18च्या माध्यमातून कमला राजपुरोहित यांनी हृदयस्पर्शी आवाहन केलं होतं. बाळ सापडल्यानंतर त्यांनी न्यूज 18चे मनापासून आभार मानले. बाळ सापडल्यानंतर कमला यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. 'मी माझ्या काळजाच्या तुकड्यासाठी तळमळत होते. आता माझं बाळ मला परत मिळालं असून, हा माझ्यासाठी पुर्नजन्मच आहे,' असं त्या म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Baby kidnap, Madhya pradesh