बंगळुरू 16 एप्रिल : जाती-धर्म याच्या आधारे भेदभाव करू नये, अशी शिकवण आपल्या संतांनी शेकडो वर्षांपूर्वी दिली. भारतीय राज्यघटनाही तेच सांगते. तरीही अजूनही जातीच्या-धर्माच्या आधारे भेदभावाची काही उदाहरणं आपल्या देशात पाहायला मिळतात. नुकतंच कर्नाटकच्या (Karnataka) मैसूर (Mysuru) जिल्ह्यातल्या कप्पासोगे (Kappasoge) गावात दलितांना (Dalit Community) भेदभावाची वागणूक दिल्याच्या काही घटना घडल्या. मात्र, त्यातून प्रेरणा घेऊन दोन दलित बंधूंनी नवा उपक्रमच सुरू केला.
के. पी. महादेव आणि के. पी. सिद्धराजू अशी त्या दोघा भावांची नावं. आपल्या दलित समाजातल्या बांधवांसाठी त्यांनी हाती कात्री आणि वस्तरा (Barber Shop) घेतला. त्यांच्या कप्पासोगे गावातल्या सलून्समध्ये दलितांना कायमच भेदभावाची वागणूक दिली जात आणि अनेकदा त्यांना सेवा देण्यास नकारही दिला जाई. त्यामुळे अनेकदा त्यांना केवळ केस कापून घेण्यासाठी उल्लाहल्ली किंवा नान्जानगुड या शहरांत जावं लागे. त्यात त्यांचा इतका वेळ जाई, की त्यांना त्यादिवशी कामावर जाता येत नसे. हातावर पोट असणाऱ्यांचा कामाचा एक दिवस बुडला, तरी खूप मोठा फटका बसतो.
या परिस्थितीशी सामना करण्यासाठी अखेर महादेव आणि सिद्धराजू या दोघा भावांनी स्वतःच कैची, वस्तरा हाती घेऊन आपल्या बांधवांना सेवा द्यायचं ठरवलं. आता ते आपल्या कप्पासोगे गावासह आजूबाजूच्या कुरुहुंडी, गौडाराहुंडी, मदनहळ्ळी या गावांमध्येही जाऊन सेवा देतात. महादेव आणि सिद्धराजू यांच्या या उपक्रमाला आता आठ वर्षं झाली आहेत.
'दी न्यू इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना महादेव यांनी सांगितलं, की केवळ पैसे मिळवण्यासाठी आम्ही हे करत नाही. समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, असं आम्हाला वाटतं. सरकारने अर्थसहाय्य पुरवलं, तर सर्वांसाठी एक सलून सुरू करण्याचाही त्यांचा विचार आहे. तसंच, गावातल्या दलित वस्त्यांमध्येही सलून्स उघडण्याचा त्यांचा विचार आहे, जेणेकरून कोणाही समाज बांधवाला असा त्रास होऊ नये.
महामारीच्या काळात जेव्हा लॉकडाऊन झालं, तेव्हा या दोघा भावांनी सर्वांनाच ही सेवा देण्यास सुरुवात केली. केस कापण्यासाठी 40 रुपये, तर दाढी करण्यासाठी 20 रुपये ते घेतात. मात्र गेली आठ वर्षं याप्रकारे काम करून तसंच वारंवार विनंती करूनही स्थानिक पातळीवरच्या राजकीय नेत्यांकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नसल्याबद्दल ते खंतही व्यक्त करतात.
जातिभेदाचं (Discrimination) निर्मूलन कागदावर झालेलं असलं, तरी अनेक लोकांच्या मनातून जात अद्याप जाता जात नाही. त्यामुळे अनेक गावांमध्ये असा भेदभाव पाहायला मिळतो. काही ठिकाणी तर दलितांना सार्वजनिक विहिरीतूनही पाणी काढू दिलं जात नाही.
मैसूर जिल्ह्यातल्या एका केशकर्तनकाराने अनुसूचित जाती-जमाती आणि मागासवर्गीय जातींतल्या व्यक्तींना सेवा दिल्याबद्दल त्याला कथित उच्चवर्गीय लोकांकडून टीका सहन करावी लागली होती. मल्लिकार्जुन शेट्टी (Mallikarjun Shetty) असं त्या केशकर्तनकाराचं नाव. वरच्या जातीच्या एका नेत्याने त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. तसंच, सर्वांना समान वागणूक दिल्याबद्दल त्याला 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.