नवी दिल्ली ; 21 जानेवारी : भारतात 16 जानेवारीला कोरोना लसीकरणाला(Corona Vaccine ) सुरुवात झाली आहे. देशभरातील सर्व आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. आतापर्यंत लाखो कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली असून लसीकरणानंतर मोठा विपरीत परिणाम झाल्याची घटना समोर आलेली नाही. आतापर्यन्त 9,99,065 आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात आली असून आता भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल (Saina Nehwal) हिने या कोरोना लसीवर खूप महत्त्वाचे भाष्य केलं आहे.
सायना नेहवाल हिने आपल्या इन्स्टाग्राम(Instagram) अकाउंटवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तिने आजचा दिवस हा आपल्या देशासाठी अभिमानास्पद आहे. आपण आपल्या देशात जागतिक स्तरावरील लस तयार केली आहे. मला भारतातील मेडिकल टीम आणि शास्त्रज्ञांबद्दल मोठा आदर आहे. त्यांनी खूप परिश्रम घेऊन ही लस तयार केली आहे. संपूर्ण देशाच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. मला भारताच्या मेडिकल टीमवर पूर्ण विश्वास आहे. भारतात तयार केलेली लस सुरक्षित असून यामुळे नागरिकांचे जीवन वाचवण्यास मदत होणार आहे.
कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्या. याचबरोबर कोरोनाविरुद्धची ही लढाई संपली नसून, लसीकरणाबरोबरच सर्व नियमांचे पालन देखील करा. मास्क आणि सुरक्षित अंतर ठेवा. यामुळे लस घ्या आणि कोरोनाला पळवा,असे आवाहन तिने आपल्या या पोस्टमधून देशवासीयांना केलं आहे.
लसीकरणाच्या पहिल्या दिवशी लसीकरण योग्य पद्धतीने पार पडल्याची माहिती अतिरिक्त आरोग्य सचिव मनोहर अगनानी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. एकाच दिवसात 3,352 ठिकाणी लसीकरणाची ही मोहीम राबवण्यात आली असून 1,91,181 लाभार्थींना ही लस देण्यात आली आहे. यासाठी 16,755 कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. या लसीकरण मोहिमेत कोविशील्ड(Covishield) आणि कोवॅक्सीन(Covaxin) या दोन्ही लसींचा वापर करण्यात आला. आसाम, बिहार, दिल्ली, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश अशा एकूण 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही लसीकरणाची मोहीम राबवण्यात आली.