नवी दिल्ली, 19 डिसेंबर : स्टेच्यू ऑफ यूनिटी आणि साबरमती रिव्हरफ्रंट दरम्यान SpiceJet कडून सी-प्लेन सेवा पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे. 27 डिसेंबरपासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट (Sabarmati Riverfront) ते केवडियामधील स्टेच्यू ऑफ युनिटीपर्यंत (Statue of Unity)भारतातील पहिल्या सी-प्लेन सेवेचं 31 ऑक्टोबर रोजी उद्घाटन केलं होतं. परंतु ही सेवा सुरू झाल्याच्या काही दिवसांतच बंद करण्यात आली होती.
स्पाइसजेटने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, स्पाइसजेटच्या मालकीची असलेली कंपनी स्पाइसशटल (SpiceShuttle) अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट ते केवाडियातील स्टेच्यू ऑफ यूनिटीदरम्यान, सी-प्लेन सेवा 27 डिसेंबर 2020 पासून सुरू होणार आहे. या मार्गावर दररोज दोन उड्डाणे केली जातील. या सेवेसाठी प्रवासी 20 डिसेंबर 2020 पासून बुकिंग करू शकतात.
सी-प्लेनच्या देखरेखीमध्ये काही अडचण आल्याने, ही सेवा थांबवण्यात आली होती. 200 किमी अंतरावर असलेल्या या दोन्ही मार्गातील अंतर पार करण्यासाठी सी-प्लेनला जवळपास 40 मिनिटांचा वेळ लागतो. या प्लेनमधून प्रवास करण्यासाठी वनवे भाडं 1500 रुपये आहे. या प्लेनमध्ये 12 लोकांना बसण्याची व्यवस्था आहे. www.spiceshuttle.com यावरून तिकीट बुकिंग करता येणार आहे.
स्पाइसजेटने उडाण योजनेंतर्गत देशभरात 18 सी-प्लेन मार्गांचा समावेश केला आहे. सरकार सी-प्लेन दुसऱ्या मार्गांवरही सुरू करणार आहे. गुवाहाटी, अंदमान-निकोबार, दिल्ली यमुना ते उत्तराखंडमधील टप्पर धरण मार्गावरही सी-प्लेन चालवण्याची योजना आखली जात आहे. भारतात पर्यटन वाढवण्यासाठी सुरू केलेल्या अनेक प्रकल्पांपैकी सी-प्लेन हा एक प्रकल्प आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmedabad, Statue of unity