नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी राजकारणात उतरण्याचे संकेत सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून दिले आहेत. सध्या त्यांच्यामागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्याबाबतही त्यांनी पोस्टमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.
मनी लॉंडरिंग प्रकरणात अडकवण्यात आल्याचे रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटले आहे. ईडीची चौकशी झाली की देशातील नागरिकांची विशेषत: उत्तर प्रदेशीतील जनतेसाठी काम करायचे असल्याचं रॉबर्ट वाड्रा यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी माझ्यावर आरोप केले जात आहेत. मात्र हे आरोप निराधार असल्याचं लोकांना कळत आहे. लोकांनी या काळात माझ्यावर विश्वास दाखवलात आणि मला शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आभारी आहे. लहान मुलांमध्ये मिसळणं आणि त्यांच्यासोबत राहिल्याने मला प्रेरणा मिळते. आपत्ती काळात मदत केल्यानंतर एक वेगळंच समाधान मनाला मिळतं. केरळ पूरग्रस्तांना केलेल्या मदतीत याचा अनुभव आल्याचे रॉबर्ट वाड्रा यांनी पोस्टमध्ये लिहलं आहे.
पुढचे काही दिवस अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी होईल. कायद्याचे उल्लंघन न करता सर्व काही केलं आहे. त्यामुळे मी चौकशीला खंबीरपणे सामोरा जात आहे. देशातील विविध ठिकाणी काम करताना मला आनंद मिळाला. प्रत्येक ठिकाणी तिथल्या लोकांनी भरभरून प्रेम केलं. याला असंच वाया जाऊ देणार नाही. एकदा माझ्यावरचे आरोप निराधार असल्याचं सिद्ध झाले की त्यानंतर लोकांची सेवा करण्यासाठी मला वेळ द्यावा लागेल असं वाड्रा यांनी म्हटलं आहे.
रॉबर्य वाड्रा यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टसोबत केरळ आणि नेपाळमधील मदतकार्यावेळीचे फोटोही शेअर केले आहेत. प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारण प्रवेशानंतर आता त्यांच्या या पोस्टने राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. प्रियांका गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वाड्रा यांनी पोस्टमध्ये उत्तर प्रदेशबद्दल विशेष उल्लेख केला आहे.