नवी दिल्ली, 28 फेब्रवारी : राजधानी दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये फेब्रुवारी महिन्यात तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत सोमवारी कमाल तापमान 32.3 सेल्सियस अंश नोंदवलं गेलं, जे सात अंशांनी जास्त होतं. येत्या काही दिवसांत वायव्य, पश्चिम आणि मध्य भारतातील कमाल तापमान सामान्यपेक्षा 3-5 अंश सेल्सिअस जास्त असेल, असा इशारा IMD म्हणजेच भारतीय हवामान विभागाने गेल्या आठवड्यात दिला होता. दिल्लीसह देशातील अनेक भागांत मार्चमध्ये तापमान 40 डिग्रींवर जाऊ शकतं. पण अचानक वातावरणात झालेल्या या बदलामागची कारणं काय? ते जाणून घेऊयात. या संदर्भात ‘नवभारत टाइम्स’ने वृत्त दिलंय. हीटवेव्ह इतक्या लवकर कशी? फेब्रुवारीमधलं तापमान आणि मार्च महिन्यातील तापमानाचा अंदाज पाहता हीटवेव्ह लवकरच सुरू होणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानात वाढ झाली आहे. पावसाचा अभाव हे यामागचं मुख्य कारण आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये हवामानात कोणतेही विशेष वेस्टर्न डिस्टर्बन्स नव्हते, असं हवामानतज्ज्ञांचं म्हणणं आहे. मैदानी आणि डोंगराळ भागात पाऊस कमी झाला. परिणामी, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश या भागांत तापमानात झपाट्याने वाढ झाली. वेस्टर्न डिस्टर्बन्सचा हा कोणता त्रास? पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेशामध्ये पावसामुळे तापमानात घट होते, पण या वेळी तसं झालं नाही. वेस्टर्न डिस्टर्बन्सने उत्तरेकडील वारे रोखले गेल्यामुळे उष्णता वाढत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर भारतात थंडीच्या आगमनाचे संकेत देतात. ते या हंगामात पाऊस आणि वादळासारखी परिस्थिती निर्माण करतात. ती भू-मध्य समुद्रात तयार होऊन इथपर्यंत पोहोचते. हे वारे पश्चिम भारताकडे वाहतात, परंतु हिमालय आणि आजूबाजूच्या प्रदेशात त्याचा प्रभाव पडतो. यामुळे, पर्वतांभोवती बर्फ पडतो आणि संपूर्ण वायव्य भारतात नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत पाऊस पडतो आणि तापमानात घसरण सुरू होते. मात्र या वेळी असं झालं नाही. तिसरीत शिकणारी शेतकऱ्याची लेक शाळा सोडून शेतात, कांद्यानं चिमुकल्यांनाही रडवलं हीटवेव्ह मागची कारणं काय? एका अहवालानुसार हीटवेव्हमागे अनेक कारणं आहेत. वसंत ऋतूमध्ये वारं सहसा पश्चिम-वायव्येकडून वाहतं. पण, भारतासाठी ही चांगली बातमी नसल्याचं अहवालात म्हटलंय. या दिशांनी वाहणाऱ्या वाऱ्यामुळे, मध्यपूर्वेतील इतर प्रदेशांपेक्षा मध्यपूर्व प्रदेशात तापमान जास्त वाढतंय. हे तापमान भारताच्या दिशेने वाहणाऱ्या गरम हवेचा स्रोत म्हणून काम करतं. तसंच वायव्येकडून वाहणारे वारे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील पर्वतरांगांवरून वाहतात. ते वारे भारतात वाहणाऱ्या वाऱ्यांना गरम करत आहेत. असं हवामान होण्याची ही पहिलीच वेळ नाही, या आधीही हवामानात अशाप्रकारे बदल होताना दिसले आहेत, मात्र गेल्या काही वर्षांत हा प्रकार अधिकच पाहायला मिळत आहे. वातावरणात हळूहळू होत असलेल्या बदलांमुळे हवामानाचे स्वरूप बदलत असून उन्हाळ्याचे दिवस वाढत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.