उस्मानाबाद, 28 फेब्रुवारी : कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. कांद्याच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांवर रडण्याची पाळी आली. भाव मिळत नसल्याचे शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. त्यातच आता उस्मानाबादमधून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. अपसिंगा गावातील इयत्ता तिसरीत शिकणारी धनश्री कोल्हे आपल्या बापाने लावलेल्या दोन एकर कांद्याची वेचणी करत आहे. तिला या कांद्याला किती भाव आहे, याची कल्पनाही नाही. परंतु तिने आपल्याला नवीन कपडे घेण्याचा बापाकडे हट्ट केला आणि बाप म्हणाला शेताला शेतात कांदे वेचायला चल,, मजूर लावून कांदा काढणं परवडत नाही. त्यामुळे तिसरीत शिकणारी धनश्री आपल्या बापाला शेतात कांदा वेचणीसाठी मदत करत आहे.
एका शेतकऱ्याने कांदा कळूवून टाकला - सध्या कांद्याला कवडीमोल भावाने विकला जात असल्याने अपसिंगा गावातील श्रीहरी भाकरे या शेतकऱ्याने कांद्याचा उत्पादन खर्चही निघणार नाही, म्हणून आपल्या शेतातील तीन एकर कांदा कुळवण टाकला. तसेच कुळवण्यासाठी ही ट्रॅक्टरच्या खर्चासाठी उसनवारी केलली असून तीन एकर कांदा कुळवण्यासाठी त्यांना 2400 रुपये खर्च आला आहे. कांदा कुळवताना शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले होते. आपल्या हृदयावर दगड ठेवून भाकरे यांनी कळूवून टाकला असल्याचे भाकरे यांनी सांगितले.
जगात कांद्याला सोन्याचा भाव - राज्यात कांद्याला अगदी कवडीमोल भाव मिळत आहे. मात्र, याच कांद्याला परदेशात सोन्याचा भाव मिळत आहे. अनेक देशांमध्ये कांदा तब्बल 750 टक्क्यांनी महाग झाला आहे. फिलिपाईन्समध्ये कांद्याचा भाव 2.5 हजार रुपये किलोपर्यंत गेला आहे. तर भूकंपग्रस्त तुर्कीपासून पाकिस्तान, कजाकिस्तान इत्यादी देशांमध्ये कांदा जनतेला रडवित आहे. महिनाभरात भारतात कांद्याचे दर सरासरी 30 टक्क्यांनी घटले आहेत. तर जगातील अन्न टंचाईचे प्रतिनिधित्व कांदा करतोय. अनेक देशांमध्ये कांद्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी दरवाढ दिसत आहे. अनेक देशांमध्ये जेवणातून कांदा हद्दपार झालेला दिसत आहे.