देशात ओमिक्रॉनबाबत दिल्ली आणि उत्तर भारतातील इतर राज्यांमध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आता ख्रिसमस आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटक हिमाचल प्रदेशकडे वळू लागले आहेत.
दिल्ली, चंदीगड आणि हरियाणासह अनेक राज्यांतील पर्यटक शिमल्यात दाखल झाले आहेत. त्यामुळं शिमल्याच्या रिज मैदानात लोकांची गर्दी पाहायला मिळाली.
शिमल्यातील हॉटेल्स पूर्णपणे खचाखच भरलेली आहेत. वीकेंड आणि ख्रिसमसमुळे सुट्ट्या असल्याने लोक येथे पोहोचू लागले आहेत.
हिमाचल पर्यटन विकास महामंडळाचे एमडी अमित कश्यप यांनी सांगितलं की 24 ते 31 डिसेंबर दरम्यान सुमारे 5 लाख पर्यटक शिमल्यात पोहोचतील. नोव्हेंबरच्या अखेरीस 47 लाख पर्यटक शिमल्यात पोहोचले आणि आता ही संख्या वाढत आहे.
हिमाचल पर्यटन महामंडळाच्या हॉटेल हॉलि डे होममध्ये 24 ते 31 डिसेंबर दरम्यान फूड फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पर्यटकांना काश्मिरी जेवण दिलं जाणार आहे. त्यासाठी खास स्वयंपाकी बोलावण्यात आले आहेत.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली आहे. शहराची 5 सेक्टरमध्ये विभागणी करण्यात आली आहे. अशी माहिती डीएसपी कमल वर्मा यांनी दिली आहे.