नवी दिल्ली, 26 जानेवारी: आज संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) जल्लोषात मग्न आहे. . यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा हा स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात साजरा होत आहे, हे वर्ष देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ म्हणून साजरे केले जात असल्यामुळे या सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. अनोखे उपक्रम मुख्य संचलना दरम्यान अनेक उपक्रम पहिल्यांदाच आयोजित केले असून यात राष्ट्रीय छात्रसेनेच्या छात्र सैनिकांद्वारे ‘शहीदों को शत शत नमन’ कार्यक्रमाचा आरंभ, भारतीय हवाई दलाच्या 75 विमाने/हेलिकॉप्टर्सचे भव्य हवाई प्रदर्शन, देशव्यापी वंदे भारतम नृत्य स्पर्धेद्वारे निवडलेल्या 480 नर्तकांचे सांस्कृतिक कार्यक्रम. तसेच, ‘कला कुंभ’ कार्यक्रमादरम्यान दृश्य कला पद्धतीचा वापर करून स्वातंत्र्य लढ्यातील दुर्लक्षित नायकांच्या नावांची यादी असलेल्या प्रत्येकी 75 मीटर लांबीच्या दहा लेखपटांचे प्रदर्शन, हा सोहळा प्रेक्षकांना चांगल्या रितीने अनुभवता यावा यासाठी 10 मोठ्या एलईडी स्क्रीन ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळ्यासाठी, प्रोजेक्शन मॅपिंगसह स्वदेशी बनावटीच्या 1,000 ड्रोनद्वारे ड्रोन शो यांसारख्या अनोख्या कार्यक्रमांचा यात समावेश आहे. कोविड प्रतिबंधासाठी सुरक्षा उपाय संचलनामध्ये केवळ कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या प्रौढ/लसीची एक मात्रा घेतलेल्या 15 वर्षे आणि त्यावरील मुलांना प्रवेश दिला जाईल. सर्व सामाजिक अंतराचे नियम पाळले जातील आणि मास्क घालणे अनिवार्य आहे. या वर्षी महामारीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही परदेशी तुकडी संचलनात सहभागी होणार नाही. संचलनाच्या वेळेत बदल संचलन आणि हवाई प्रदर्शनासाठी अधिक चांगली दृश्यमानता असावी यादृष्टीने, राजपथावरील संचलन पूर्वीच्या सकाळी 10 वाजताच्या वेळे ऐवजी सकाळी 10. 30 वाजता सुरू होईल. खास प्रेक्षक समाजातील ज्या घटकांना सहसा संचलन पाहायला मिळत नाही त्यांना संधी देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ऑटो-रिक्षा चालक, बांधकाम कामगार, सफाई कर्मचारी आणि आघाडीवर राहून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिन संचलन तसेच ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळा पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे. राजपथवर या खास गोष्टी पाहायला मिळतील:- 1965 आणि 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात वापरलेली शस्त्रे आणि उपकरणे दाखवली जाणार आहेत. जुनी चिलखती वाहने आणि तोफखाना हे भारतीय सैन्याने गेल्या दशकात लढलेल्या युद्धांचे प्रतीक असेल. - जुनी उपकरणे, शस्त्रे आणि तंत्रज्ञान बदलण्यासाठी नवीन गोष्टी देखील प्रदर्शित केल्या जातील. यावेळी प्रजासत्ताक उत्सव आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यांचा अनोखा मेळ ही परेड असेल चित्ररथ यानंतर ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या संकल्पनेवर आधारित तयार करण्यात आलेल्या 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि नऊ मंत्रालये/विभागांच्या चित्ररथाचे सादरीकरण केले जाईल. यात ‘महाराष्ट्राची जैवविविधता आणि राज्य जैव-मानके’ या विषयावरील चित्ररथाचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.