नवी दिल्ली, 24 जानेवारी: गेल्या काही काळापासून महाराष्ट्रासह देशात हवामानाचं गणित बिघडलं आहे. ऐन हिवाळा सुरू असताना देशात अवकाळी पावसासह (Non seasonal rainfall) गारपीट (hailstorm) आणि बर्फवृष्टीने (snowfall) अनेक शहरांना झोडपून काढलं आहे. याचा विपरीत परिणाम शेती क्षेत्रावर होतं असून जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. येत्या काही दिवसांत उत्तर भारतात थंडीसह धुक्याची दुहेरी बॅटींग पाहायला मिळणार आहे. तर राजधानी दिल्लीत यंदा गेल्या 122 वर्षातील सर्वाधिक पाऊस (Record break rainfall in delhi) झाल्याची नोंद भारतीय हवामान खात्याने केली आहे.
रविवारी सकाळी दिल्लीसह उत्तर भारतात पावसानं उसंत घेतल्यानंतरही नागरिकांना दिलासा मिळाला नाही. येत्या आठवड्यात उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे उत्तरेत सध्या ऋतुंचा जांगडगुत्ता झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुढील 2 दिवसांत पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या विविध भागात दाट धुकं पडण्याची शक्यता आहे. तर 25 ते 27 जानेवारी दरम्यान या भागात वेगळ्या ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा-चिंता वाढवणारी बातमी, राज्यातल्या 'या' जिल्ह्यात आढळले Omicron चे तीन म्युटेशन
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रविवार सांगितलं की, येत्या काही दिवसांत नागरिकांना थंडी आणि धुक्याच्या दुहेरी त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. IMD पुढे सांगितलं की, 2022 च्या जानेवारी महिन्यात झालेल्या पावसानं गेल्या 122 वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. तर पुढील आणखी काही दिवस दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेशासह अनेक राज्यांतील लोकांना थंडीपासून सुटका मिळणार नसल्याचा इशारा हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा-Corona तून बरे झाल्यानंतर ताबडतोब बदला या गोष्टी, नाहीतर पुन्हा सापडाल तडाख्यात
जानेवारी महिन्यातील पावसानं मोडला 122 वर्षांचा रेकॉर्ड
हवामान खात्याच्या नोंदीनुसार, 2022 सालच्या जानेवारी महिन्यात पडलेल्या पावसानं 122 वर्षांचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी 1989 आणि 1995 च्या जानेवारीत पावसाची ही स्थिती पाहायला मिळाली होती. 2022 च्या जानेवारी महिन्यात आतापर्यंत 88 मिमी पाऊस पडला आहे. हवामान खात्याच्या डेटाबेसनुसार हा पाऊस 1901 नंतरचा सर्वाधिक पाऊस आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.