मुंबई, 17 मार्च : लवकरच पवित्र रमजानचा महिना सुरू होणार आहे. इस्लामिक कॅलेंडरमधील नववा महिना हा पवित्र रमजानचा महिना असतो. या महिन्यात जगभरातील मुस्लीमधर्मीय उपवास करतात. भारत आणि पाकिस्तानमध्ये या उपवासाला रोजा म्हणतात. प्रार्थना, चंद्राचं प्रतिबिंब पाहणं आणि समाजासाठी चांगलं काम करून हा महिना साजरा केला जातो. रमजान महिना चार आठवडे आणि दोन दिवसांचा असतो. या काळात मुस्लीम सूर्योदय ते सूर्यास्तादरम्यान उपवास करतात. या संदर्भात ‘हिंदुस्तान टाइम्स’ने वृत्त दिलंय. या निमित्ताने मुस्लीम धर्मीय शांतता आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी प्रार्थना करतात. त्याचबरोबर गरिबांना अन्नदान तसंच इतर सामाजिक कार्यांच्या माध्यमातून परोपकार करतात. तसंच आत्मसाक्षात्कार करून घेण्याच्या दृष्टिने आत्मपरीक्षणही करतात. रोजापूर्वीच्या पहाटेच्या जेवणाला सुहूर म्हणतात आणि उपवास संपल्यानंतर रात्रीची मेजवानी इफ्तार म्हणून ओळखली जाते. इफ्तार पारंपरिक पद्धतीने खजूर खाऊन आणि पाणी पिऊन सुरू होतो. त्यानंतर शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारचे जेवण केले जाते. यावर्षी, मक्कामध्ये चंद्र दिसल्यानंतर 22 मार्च रोजी बुधवारच्या संध्याकाळी रमजान सुरू होण्याची अपेक्षा आहे. रमजान 21 एप्रिल 2023 रोजी संपेल आणि ईद-उल-फित्र शनिवारी 22 एप्रिल 2023 रोजी साजरी केली जाईल. …म्हणून मंदिराचं नाव आहे करंट बालाजी! देशातलं एकमेव माकडाचं मंदिर
चंद्र दर्शनाचं महत्त्व इस्लाममध्ये चंद्रकोरीच्या दर्शनाला खूप धार्मिक महत्त्व आहे. रमजानचा महिना चंद्र दर्शनाने सुरू होतो आणि चंद्रकोरीच्या दर्शनानेच महिन्याचा शेवट होते. रमजान सुरू होण्यापूर्वी लोक आणि धार्मिक नेते चंद्रकोर पाहण्यासाठी रात्री आकाशाकडे पाहतात. चंद्रकोर पाहणं ही एक परंपरा आहे, जी इस्लाम धर्मात वर्षानुवर्षे पाळली जात आहे. रमजानच्या आधीचा महिना शाबान असतो. शाबान महिन्याच्या 29 तारखेला सूर्यास्तानंतर चंद्राचं दर्शन झालं की रमजानचा महिना सुरू होतो. तेव्हा चंद्रकोर पाहण्याची परंपरा पाळली जाते. रमजानचं महत्त्व इस्लाम धर्मात रमजानला विशेष महत्त्व आहे. या महिन्यातच इस्लाम धर्मातील पवित्र ग्रंथ कुराणचं ज्ञान प्रेषित मोहम्मद यांना झालं, असं म्हटलं जातं. इस्लामवरील विश्वास प्रकट करण्यासाठी रोजा ठेवणं म्हणजे उपवास करणं ही मूलभूत गरज आहे असं मानलं जातं. रमजानमध्ये आत्मचिंतन, आध्यात्मिक प्रगती आणि प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणींचं स्मरण केलं जातं. रोजा त्यांना दैवी शक्तीशी जोडण्यास मदत करतो आणि त्यांचा धर्मातील विश्वास मजबूत करतो, असं मुस्लीम अनुयायी मानतात. उन्हाळ्यात या एका उपायाने नष्ट होतील कुंडलीतील 7 दोष, जाणून घ्या महत्त्व
रमजानचा उत्सव रमजानच्या काळात मुस्लीम अल्लाहची प्रार्थना करतात आणि सर्वशक्तिमान परमेश्वराप्रती समर्पणाचं प्रतीक म्हणून उपवास करतात. या महिन्यात मुस्लीम लोक सांसारिक सुख, खर्च आणि इतर गोष्टी सोडून मित्र आणि कुटुंबासह उपवास करतात. ते सुहूर किंवा सेहरी खाण्यासाठी पहाटे लवकर उठतात. सूर्योदयापूर्वी सुहूरमध्ये ते खजूर, फळं, दूध आणि खीर खातात. त्यानंतर सूर्यास्तापर्यंत ते काही खात-पीत नाहीत.
संध्याकाळी ते खजूर खाऊन किंवा पाणी पिऊन रोजा सोडतात. यानंतर इफ्तार म्हणजे जेवणामध्ये कबाब, टिक्का, बिर्याणी आणि निहारी यांसारखे पदार्थ तसेच शिरखुर्मा, खीर, फिरणी, शाही तुकडा आणि इतर गोड पदार्थांचा समावेश असतो.