नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर : केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक रामविलास पासवान यांचं गुरुवारी निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. 51 वर्षांच्या निवडणुकीय राजकारणात पासवान यांनी अनेक पक्ष, आघाड्या आणि व्यक्तींबरोबर सूर जमवले. बिहारचे किंग मेकर व्हायची त्यांची इच्छा होती. सहा पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद भूषवलं. UPA आणि NDA या दोन्ही सरकारांमध्ये ते मंत्रिपदी होते. पण राजकारण ही त्यांच्या करिअरची सुरुवाती नव्हती. राजकारणात येण्यापूर्वी पासवान बिहारचे DSP म्हणून नेमणुकीवर होते. याविषयीचा किस्सा स्वतः पासवान यांनीच एकदा Twitter वरून शेअर केला होता. 5 जुलै 1946 रोजी बिहारच्या खगडिया इथे रामविलास यांचा जन्म झाला. 1969 मध्ये पासवान यांनी पहिली निवडणूक जिंकली आणि आमदार झाले. पण तत्पूर्वी उच्चशिक्षण संपवल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरी करायचं ठरवलं होतं. त्यांची DSP पदी नेमणूकही झाली होती. पण त्याच वेळी राजकारण खुणावत होतं. महिन्याच्या महिन्याला पगार देणारी पक्की सरकारी नोकरी सोडायची का याविषयी द्विधा मनस्थिती असतानाच त्यांच्या मित्राने एक प्रश्न विचारला. या प्रश्नामुळे रामविलास पासवान यांचं आयुष्य आणि बिहारचं राजकारण बदलून गेलं. 1969 मध्ये रामविलास यांची DSP पदावर नेमणूक झाली होती. त्याच वेळी ते आमदार म्हणून निवडून आले. राजकारणात पडायचं की नाही याचा विचार करत असतानाच मित्राने प्रश्न केला, ‘सरकार बनवायचंय की सरकारी नोकर व्हायचंय?’ त्याच वेळी राजकारणात जायचं पासवान यांनी निश्चित केलं.
1969 मे मेरा DSP मे और MLA दोनो मे एक साथ चयन हुआ।तब मेरे एक मित्र नेपूछा कि बताओ Govt बनना है या Servant ?बस तभी मैंने राजनीति ज्वाइन कर ली
— Ram Vilas Paswan (@irvpaswan) March 26, 2016
1969 मध्ये संयुक्त सोशलिस्ट पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेले पासवान राज नारायण आणि जयप्रकाश नारायण यांचे अनुयायी होते. पासवान यांनी 2019 मध्येच निवडणूक राजकारणातली 50 वर्षं पूर्ण केली होती. त्यांनी अनेक वेळा केंद्रिय मंत्रिमंडळात खातं सांभाळलं होतं. माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग, एच.डी.देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये पासवान मंत्रिपदी होते. लोकजनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा असणारे रामविलास पासवान यांनी यापूर्वीही किंगमेकरची भूमिका निभावली होती. आता 2020 च्या विधानसभा निवडणुकीतही बिहारचा मुख्यमंत्री पासवान ठरवणार का अशी चर्चा सुरू असतानाच त्यांच्या निधनाची बातमी आली.