Home /News /national /

कोरोनाने घेतला मुलाचा बळी, विधवा सुनेसाठी सासू-सासऱ्यांनी केलं असं काही की होतोय कौतुकाचा वर्षाव

कोरोनाने घेतला मुलाचा बळी, विधवा सुनेसाठी सासू-सासऱ्यांनी केलं असं काही की होतोय कौतुकाचा वर्षाव

एकीकडे हुंड्यासाठी सुनेचा छळ करण्याचे प्रकार देशभरात वारंवार घडत असताना, राजस्थानमधील (Rajasthan) ही घटना मात्र अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.

    मुंबई,5 मे- आपल्या विधवा सुनेचा पुनर्विवाह लावून, सासू-सासऱ्यांनी तिचा संसार पुन्हा सुरू करून दिल्याची घटना राजस्थानमधून समोर आली आहे. या दोघांनी आपल्या सुनेला केवळ मुलगी मानलेच नाही, तर तिचे कन्यादानही (Widow daughter in law marriage) करुन दिले. एकीकडे हुंड्यासाठी सुनेचा छळ करण्याचे प्रकार देशभरात वारंवार घडत असताना, राजस्थानमधील ही घटना मात्र अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. या अनोख्या लग्नाची (Rajasthan wedding viral) गोष्ट सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावरही लोक या लग्नाचं, आणि महिलेच्या सासू-सासऱ्यांचं कौतुक करत आहेत. कोरोनामध्ये गमावला पती राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात राहणाऱ्या रमेश सोनी यांचा मुलगा मुकेश आणि पूजा यांचं 2003 साली लग्न झालं होतं. गेल्या वर्षी मुकेशला कोरोनाची लागण झाली आणि त्यामध्येच त्याचा बळी गेला. यानंतर पूजा अगदी शांत शांत राहू लागली. तेव्हा तिच्या सासू-सासऱ्यांनीच तिला नव्याने आयुष्य सुरू करण्यासाठी प्रोत्साहित (In laws encouraged widow daughter-in-law to remarry) केले. एवढंच नाही, तर त्यांनी पूजासाठी मुलगा पहायला देखील सुरुवात केली. सासू-सासऱ्यांनी केलं कन्यादान पूजाच्या सासू-सासऱ्यांनी तिच्यासाठी मुलगा शोधून तिचं गेल्या मंगळवारी (3 मे 2022) लग्न (Rajasthan widow remarriage) लावून दिलं. यावेळी त्यांनी पूजाचं कन्यादानही केलं. एवढंच नाही, तर कन्यादानावेळी शगुन म्हणून पूजाच्या सासऱ्यांनी तिला 2.10 लाखांची एफडी पावती दिली. जानकीनाथ मंदिरात अगदी साध्या पद्धतीने हे लग्न पार पडलं. यावेळी पूजाच्या सासू-सासऱ्यांनी तिला आपल्या मुलीप्रमाणेच नटवून लग्नासाठी उभे केले होते. दुसऱ्या पतीचीही तशीच कहाणी पूजासाठी वर शोधत असताना, रमेश सोनी यांची ओळख जयपूरमध्ये राहणाऱ्या नागरमल सोनी यांच्याशी झाली. नागरमल सोनी यांचा मुलगा कैलास याच्या पत्नीचेही गेल्या वर्षी निधन झाले होते. त्यानंतर एकमेकांशी चर्चा करून, दोन्ही कुटुंबीयांनी पूजा आणि कैलासची भेट घडवून दिली. या दोघांच्याही होकारानंतर त्यांचं लग्न निश्चित करण्यात आलं. पूजाला एक वर्षाची मुलगीदेखील आहे. लग्नानंतर ती आपल्या आईसोबतच राहील. याबाबत कसलेही दुमत नसल्याचे तिच्या सासू-सासऱ्यांनी म्हटले. एकूणच, आपल्या मुलाच्या मृत्यूचे दुःख विसरून, सुनेला नवे आयुष्य सुरू करुन देणाऱ्या या सासू-सासऱ्यांची चर्चा संपूर्ण देशभरात होते आहे. समाजासाठी हे लग्न एक आदर्श असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. नेटिझन्सही या लग्नाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत.
    First published:

    Tags: Corona, Rajasthan

    पुढील बातम्या