दिल्ली, 29 मार्च : पंजाब हरयाणा उच्च न्यायालयाने एका आरोपीच्या जामीन याचिकेवर निर्णय देण्यासाठी चॅट जीपीटीचा वापर केला. भारतात अशा प्रकारे चॅट जीपीटीचा वापर करून खटल्याची सुनावणी केल्याचा हा पहिलाच प्रकार आहे. आरोपीला जामीन फेटाळण्यात आला. अनुप चितकारा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने दंगल, धमकी, हत्या आणि गुन्ह्याचा कट रचल्याप्रकरणी जून २०२० मध्ये एकाला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायाधीशांनी चॅट जीपीटीची प्रतिक्रिया मागितली होती.
न्यायाधीश चितकारा यांनी चॅट जीपीटीवरून आलेलं उत्तर समजून घेतलं आणि आपल्या अनुभवासह आधीच्या निर्णयांच्या आधारे आरोपीची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटलं की, मृत्यूदंड देणं क्रूर आहे. पण क्रौर्य मृत्यूकडे नेणारं असेल तर परिस्थिती बदलती. जेव्हा क्रूरतेने हल्ला केला जातो तेव्हा जामीन देण्याचे निकषही बदलतात.
चॅट जीपीटीचा वापर केला त्याबाबतही न्यायालयाने भूमिका स्पष्ट केली. न्यायाधीश म्हणाले की, चॅट जीपीटीचा कोणताही संदर्भ आणि करण्यात आलेलं अवलोकन याचा उद्देश फक्त जामीनाबाबतच्या कायद्याचं एक स्पष्ट चित्र सादर करणं हे होतं.
वकील सौरव यांनी म्हटलं की, चॅट जीपीटीचा वापर हे एक चांगलं पाऊल आहे. याचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम होऊ शकतात. ते भविष्यात समोर येईल. एआयमुळे वकीलांचे व्यवसाय धोक्यात असं समजणं चुकीचं ठरेल. हे फक्त एक उपकरण म्हणून वापरलं जाऊ शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.