नवी दिल्ली 21 जून : देशभरातील अग्निपथवरुन (Agnipath Scheme) सुरू असलेला गोंधळ थांबण्याचं नाव घेत नाहीये. सोमवारी विद्यार्थ्यांच्या भारत बंदनंतर आता 24 जून रोजी संयुक्त किसान मोर्चाने (SKM) देशव्यापी बंद (Bharat Bandh) पुकारला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (21 जून) रोजी तिन्ही लष्करप्रमुखांची स्वतंत्रपणे भेट घेणार आहेत.
SKM नेते राकेश टिकैत यांनी हरियाणातील कर्नाल इथे सांगितलं की, त्यांची संघटना अग्निपथ योजनेला विरोध करेल. टिकैत म्हणाले की, एसकेएम अग्निपथ योजनेच्या विरोधात 24 जून रोजी देशभरातील जिल्हा मुख्यालयात आंदोलन करेल.
याआधी सोमवारी विद्यार्थ्यांनी देशव्यापी बंद पुकारला होता, त्याला विरोधकांनी पाठिंबा दिला होता. या आंदोलनाचा सर्वात मोठा परिणाम दिल्ली-एनसीआरमध्ये दिसून आला. दिल्ली, नोएडा, गुडगावसह एनसीआरमधील अनेक रस्ते तासंतास ठप्प होते.
दिल्लीच्या सीपीमध्ये रस्ते रोखण्यात आले होते. सीपीला लागून असलेल्या जनपथ आणि बाबा खरकसिंग मार्गावर प्रचंड जाम होता. टिळक पुलावर रेल्वेसमोर गोंधळ घालणाऱ्या १६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याचवेळी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, सलमान खुर्शीद, रणदीप सुरजेवाला, शक्ती सिंह, इम्रान प्रतापगढ़ी यांनी जंतरमंतरवर निदर्शने केली.
भारतीय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीच्या शिवाजी ब्रिज रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबवली. थांबलेली ट्रेन श्रीगंगानगर (राजस्थान) येथे जात होती. काँग्रेस कार्यकर्त्यांना तिथून हटवून गाडी रवाना करण्यात आली. दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्येही काँग्रेसने निदर्शने केली.
Agnipath Protest : 'भारत बंद'चा राजधानी दिल्लीला फटका, वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील रहिवासी राहुलने सांगितलं की, ट्रेन रद्द होत असल्याने तो 3 दिवसांपासून आपल्या कुटुंबासह रेल्वे स्टेशनवर राहत आहे.
भारत बंद दरम्यान बिहारमधील 20 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. अग्निपथ योजनेच्या विरोधात या जिल्ह्यांमध्ये हिंसाचार झाला.
17 जून रोजी अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलकांनी केलेल्या हिंसाचारामुळे उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये 27 आंदोलकांकडून दंड वसूल केला जाईल. आंदोलकांनी रस्ते आणि खाजगी वाहनांसह 36 वाहनांचं नुकसान केलं असून, जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार 12,97,000 रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
सोमवारी काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांना पोलिसांनी गाझियाबादमध्ये नजरकैदेत ठेवलं होतं. ते दिल्ली सत्याग्रह आंदोलनात सहभागी होणार होते. याशिवाय नोएडा ते दिल्लीला जोडणाऱ्या रस्त्यावरही जाम होता. नोएडा एक्स्प्रेस वेवर महामाया ब्रिज ते नोएडा गेटपर्यंत 2 किलोमीटर लांब जाम होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Army, Bharat bandh 2021, Protest