प्रयागराजमध्ये आयोजित कार्यक्रमात 45 जिल्ह्यांसाठी 202 टेक होम रेशन प्लांटचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी प्रयागराज दौऱ्याअंतर्गत बचत गटांच्या महिला आणि कन्या सुमंगला योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.
पंतप्रधानांनी यावेळी आलेल्या महिलांकडून त्यांच्या कामाची माहिती घेतली. यानंतर पंतप्रधानांनी एका लहान मुलांना आपल्या मांडीवर घेतलं आणि त्यांच्यासोबत फोटोही काढले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हे फोटो त्यांनी पोस्ट करत लिहिलं आहे की- 'प्रयागराज के अनमोल क्षण.'
यावेळी पंतप्रधानांनी सुमंगला योजनेच्या लाभार्थ्यांशी संवादही साधला. यावेळी त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेल्या अनेक मुलींशी संवाद साधला. पंतप्रधानांनी मुलींशी त्यांच्या अभ्यास आणि करिअरबद्दलही चर्चा केली. लाभार्थींशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले की, संपूर्ण देश उत्तर प्रदेशमध्ये महिलांच्या विकास आणि सक्षमीकरणासाठी केलेले काम पाहत आहे. सुमंगला योजनेमुळे राज्यात लिंग गुणोत्तरात बरीच सुधारणा झाली आहे.
पंतप्रधान म्हणाले की, गरीब कुटुंबांमध्ये मातेचं आरोग्य हे चिंतेचं कारण आहे. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेंतर्गत गरोदरपणात महिलांना त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेता यावी यासाठी 5,000 रुपये गरोदरपणात महिलांच्या खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत सुमारे 10,000 कोटी रुपये दोन कोटींहून अधिक भगिनींना देण्यात आलेले आहेत.
मोदी म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दिलेल्या 30 लाख घरांपैकी 25 लाख घरांची नोंदणी उत्तर प्रदेशात महिलांच्या नावावर आहे. "महिलांच्या खऱ्या अर्थानं सक्षमीकरणाबाबत सरकारची वचनबद्धता यातून दिसून येते." असंही यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.