मुंबई, 5 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जवळपास एक वर्षांनी विदेश दौऱ्यावर जात आहेत. कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढल्यानंतरच्या काळातील मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. पंतप्रधान 26 आणि 27 मार्च रोजी बांगलादेशच्या (Bangladesh) दौऱ्यावर जाणार आहेत. पश्चिम बंगाल (West Bengal) आणि आसाम (Assam) या दोन राज्यांमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान ज्या दिवशी होणार आहे, त्याच दिवशी मोदींचा हा दौरा आहे. त्यामुळे या दौऱ्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. बांगलादेशच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. कोरोना काळात भारतानं बांगलादेशाला लस पाठवली आहे. या माध्यमातून दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत करण्याचा भारतानं प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर या दौऱ्यात पंतप्रधान मोदी मतुआ समाजाचे धर्मगुरु हरिश्चंद्र ठाकूर यांच्या जन्मस्थळी देखील जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान या दौऱ्यात सुगंधा शक्तीपीठ आणि ओरकंडी मंदिरांमध्ये जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्याचा संबंध बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकांशी लावला जात आहे. 27 मार्च रोजी बंगालमधील 30 तर आसाममधील 47 जागांवर मतदान होणार आहे. काय आहे इलेक्शन कनेक्शन? बांगलादेशच्या स्वातंत्र्यापूर्वी तेथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पश्चिम बंगालचा आश्रय घेतला होता. त्यामध्ये मतुआ समाजाचा देखील समावेश आहे. बंगालमधील 294 पैकी 21 विधानसभा मतदार संघामध्ये या समाजाचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे या दौऱ्याच्या माध्यमातून या मतदारांची मतं आपल्याकडं वळवण्याचा मोदींचा प्रयत्न असेल. (वाचा : ‘मराठी लोक चांगले पण कानडी XXX…’ Sex Tape case मध्ये अडकलेल्या माजी मंत्र्याचं आणखी एक वादग्रस्त चॅट लीक ) 2016 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमुल काँग्रेसनं (TMC) 21 पैकी 18 जागांवर विजय मिळवला होता. सीएए (CAA) कायद्यानंतर यामधील 9 जागांवर भाजपाला चांगली आघाडी मिळाली आहे. मतुआ समाजानं सीएए आणि प्रस्तावित एनआरसी (NRC) कायद्याला उघड पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या बंगालादेश दौऱ्याचा मतुआ समाजाची मतं मिळवण्यासाठी उपयोग होईल अशी आशा भाजपाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.