कोलकाता, 7 मार्च : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) ‘मिशन बंगाल’ला बळ देण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची कोलकातामध्ये सभा होणार आहे. कोलकातामधील ब्रिगेड परेड मैदानावर होणाऱ्या या सभेची भाजपनं जय्यत तयारी केली आहे. बंगाल विधानसभा निवणुकीसाठी (West Bengal Assembly Elections 2021) भाजपाच्या प्रचाराला या सभेमुळे बळ मिळण्याची अपेक्षा आहे. यावेळी चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत.
बंगालमधील ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची सत्ता घालवण्यासाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे. राज्यात 27 मार्च ते 29 एप्रिल दरम्यान आठ टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं मतदानाच्या तारखा जाहीर केल्यानंतर मोदींची बंगालमध्ये पहिल्यांदाच सभा होणार आहे.
57 उमेदवारांची घोषणा
बंगालमधील 57 उमेदवारांची घोषणा भाजपनं केली आहे. भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी या यादीवर शिक्कामोर्तब केले आहे. राज्यातील लक्षवेधी नंदीग्राम मतदारसंघातून (Nandigram Assembly seat) शुभेंद्रू अधिकारी (Shubhendu Adhikari) यांना भाजपनं उमदेवारी दिली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांची लढत होणार आहे.
ममता यांचा नंदीग्राम हा बालेलिल्ला इतकी वर्ष सांभाळणारे शुभेंद्रु अधिकारी आता भाजपामध्ये आहेत. ममता आणि अधिकारी यांनी नंदीग्राममध्येच एकत्र येऊन डाव्या पक्षांच्या विरोधात संघर्ष सुरू केला आणि 34 वर्षांनी बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झाले. आपण ममता यांना कोलकातामध्ये परत पाठवू असा विश्वास अधिकारी यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर व्यक्त केला आहे.
( वाचा : ममतांना आणखी एक धक्का, जुन्या सहकाऱ्याचा भाजपमध्ये प्रवेश )
मिथुन चक्रवर्तीही राहणार उपस्थित
पंतप्रधान मोदी यांच्या सभेला भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह ज्येष्ठ चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती देखील उपस्थित राहणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी ही घोषणा केली आहे. शनिवारी विजयवर्गीय यांनी मिथुन चक्रवर्तींची भेट घेतली. यामध्ये मिथुन मोदींच्या सभेला उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election 2021, BJP, Mamata banerjee, Pm narendra modi Rally, TMC, West bengal