नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावर धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. काल लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवरही पंतप्रधानांनी पलटवार केला. 'ईडीमुळे विरोधक एकत्र आले, निवडणूक हरल्यानंतर एकत्र आले नाहीत. मतदारांना जे जमलं नाही ते ईडीमुळे शक्य झालं', अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.
'काही जणांनी काल हावर्ड विद्यापीठाचा दाखला दिला. पण हावर्ड विद्यापीठात भारतीय काँग्रेसचा ऱ्हास यावर अभ्यास झाला. भविष्यात मोठ्या विद्यापीठातही असाच अभ्यास होईल, ज्याने काँग्रेस डुबवली त्याच्यावरही अभ्यास होईल', अशी टीका पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर केली.
'निवडणूक हरले तर ईव्हीएमला शिव्या देतात. निवडणूक आयोगाला शिव्या देतात. निकाल आपल्या बाजूने लागला नाही तर सुप्रीम कोर्टाला शिव्या देतात. विरोधक निराशेमध्ये आहेत. मोदींना शिव्या द्या, मोदींवर खोटे आरोप करा तरच मार्ग निघेल, असं काहींना वाटतंय. मागच्या 22 वर्षात ते याच गैरसमजामध्ये आहेत. देशाच्या लोकांसाठी, देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मोदीने प्रत्येक क्षण खर्ची घातला आहे', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
'देशाचा मोदीवर विश्वास आहे, हे यांना समजण्याच्या पलीकडे आहे. 80 कोटी लोकांना फुकट धान्य मिळालं, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, ते तुमच्या खोट्या आरोपांवर कसा विश्वास ठेवेल? काही जण स्वत:च्या कुटुंबासाठी जगत आहेत, मी 25 कोटी कुटुंबाच्या घरातला सदस्य आहे. 140 कोटी जनतेचे आशिर्वाद माझ्यासाठी सुरक्षा कवच, मला शिव्या देऊन हे सुरक्षा कवच तुम्ही भेदू शकत नाही', असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.
'जे आधी इथे बसायचे ते तिकडे जाऊनही फेल झाले, पण देश पास झाला. निराशेच्या गर्तेत बुडालेल्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आताच काही जण जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन आले. लालचौकात तिरंगा लावण्याचा संकल्प घेऊन मीही मागच्या शतकात गेलो होतो, तेव्हा दहशतवाद्यांनी पोस्टर लावले होते. 26 जानेवारीला 11 वाजता मी लालचौकात सुरक्षा न घेता येईन, हे मी सांगितलं होतं. श्रीनगरच्या लालचौकात तिरंगा फडकावला. आता तुम्ही काश्मीरमध्ये जाऊ शकता. पर्यटनाच्या बाबतीत जम्मू-काश्मीरने सगळे रेकॉर्ड मोडले', असं पंतप्रधान म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Congress, PM Narendra Modi, Rahul gandhi