भोपाळ, 27 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी भाजपच्या 10 लाख कार्यकर्त्यांना संबोधित केलं, यात त्यांनी विरोधी पक्षांच्या एकजुटीवरही जोरदार प्रहार केला. पाटण्यामध्ये झालेल्या विरोधी पक्षांची बैठक म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांचा मिलाप असून 20 लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्याची गॅरंटी देता येईल, अशी टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जी लोक आधी एकमेकांना शत्रू मानत होते, शिव्या देत होते, त्यांच्यासमोरच आज साष्टांग घालत आहेत. त्यांची ही बेचैनी म्हणजे 2024 ला भाजपचा प्रचंड विजय होणार आहे, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. ‘हल्ली वारंवार गॅरंटी हा शब्द वापरला जातो, हे सगळे विरोधी पक्षनेते, हे लोक भ्रष्टाचाराची गॅरंटी आहे. लाखो-करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराची ही गॅरंटी आहे. काही दिवसांपूर्वी यांनी एकत्र फोटो काढले. या फोटोमध्ये असलेल्या सगळ्यांची टोटल केली तर 20 लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्याची गॅरंटी आहे,’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. पंतप्रधान मोदींनी काँग्रेस, राष्ट्रवादी, आरजेडी, टीएमसी यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचारांची यादी वाचून दाखवली. ‘काँग्रेसचा एकट्याचाच घोटाळा लाखो-करोडोंचा आहे. 1 लाख 86 हजार कोटींचा कोळसा घोटाळा, 1 लाख 76 हजार कोटींचा टूजी घोटाळा, 70 हजार कोटींचा कॉमनवेल्थ घोटाळा, 10 हजार कोटींचा मनरेगा घोटाळा, हेलिकॉप्टर सबमरीन पासून असं कोणतंही क्षेत्र नाही, जिकडे काँग्रेसने घोटाळा केला नाही,’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. ‘आरजेडीवर हजारो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. चारा घोटाळा, अलकतारा घोटाळा, पूर राहत घोटाळा, आरजेडीच्या घोटाळ्यांची यादी एवढी मोठी आहे की कोर्टही थकली. एका पाठोपाठ एक शिक्षा दिल्या जात आहेत. डीएमकेवर अवैध पद्धतीने सव्वा लाख कोटी रुपयांची संपत्तनी बनवण्याचा आरोप, टीएमसीवर 23 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, रोझवॅली, शारदा घोटाळा, गोतस्करी घोटाळा, कोळसा तस्करी घोटाळा, बंगालची लोक हे घोटाळे विसरू शकत नाहीत. राष्ट्रवादीवरही 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. या पक्षांच्या घोटाळ्यांचं मीटर कधी डाऊनच होत नाही,’ असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. पंतप्रधानांचा इशारा भ्रष्टाचाऱ्यांविरोधात ऍक्शन सुरूच राहिल, असा इशाराही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. ‘जर त्यांची घोटाळ्याची गॅरंटी आहे, तर माझीही प्रत्येक घोटाळेबाजावर कारवाईची गॅरंटी आहे. प्रत्येक चोर-लुटारूवर कारवाईची गॅरंटी आहे. ज्यांनी गरिबांना लुटलं आहे, ज्यांनी देशाला लुटलं आहे, त्याचा हिशोब द्यावा लागेल. आज कायद्याचा बडगा चालू आहे, जेल समोर दिसत आहे, तेव्हा ही जुगलबंदी सुरू झाली आहे. भ्रष्टाचाराविरोधातल्या ऍक्शनपासून वाचण्यासाठी ही जुगलबंदी सुरू आहे. यांचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम भ्रष्टाचाराविरोधातल्या ऍक्शन पासून वाचणे हाच आहे. भाजप कार्यकर्ते या गोष्टी गावागावापर्यंत पोहोचवतील तेव्हा लोकांना याची वास्तविकता कळेल. विरोधकांच्या एकीमागे त्यांच्या मनिषा काय आहेत, हे लोकांना माहिती आहेत. 20 लाख कोटींच्या घोटाळ्याची गॅरंटी, हाच त्यांचा इतिहास आहे,’ असा निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.