पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी रात्री अचानक सेंट्रल व्हिस्टाच्या बांधकाम साइटला भेट दिली आहे. घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी तेथील उपस्थित असलेल्या अभियंत्यांकडून नवीन संसदेच्या इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेतला. पीएम मोदींनी यावेळी सुरक्षा मापदंडाची सर्व काळजी घेत ही भेट दिली आहे. पंतप्रधान मोदींनी यावेळी हेल्मेटदेखील घातलं होतं.
एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी यांनी पावणे नऊच्या सुमारास अचानक सेंट्रल व्हिस्टाच्या बांधकाम साइटला भेट दिली आहे. ते याठिकाणी येणार असल्याची वाढीव माहिती कोणालाही दिली नव्हती. राजधानी दिल्लीत सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद भवनाची निर्मिती केली जात आहे.
पुढील वर्षापर्यंत नवीन संसद भवनाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने मजूर दिवस रात्र वेगाने काम करत आहेत.
नवीन संसद भवनाची इमारत जुन्या इमारतीपेक्षा 17 हजार चौरस मीटर मोठी असणार आहे. सुमारे 971 कोटी रुपये खर्च करून एकूण 64500 चौरस मीटर क्षेत्रात ही इमारत उभारली जाणार आहे. या इमारतची रचना त्रिकोणी असून तिची उंची जुन्या इमारती इतकीच असणार आहे. यामध्ये एक मोठं संविधान सभागृह, खासदारांसाठी विश्रामगृह, ग्रंथालय, विविध समित्यांसाठी स्वतंत्र्य खोल्या, जेवणाचं ठिकाण असे अनेक विभाग असतील.