नवी दिल्ली, 08 फेब्रुवारी : राज्यसभेत पंतप्रधान मोदी यांनी जोरदार भाषण करत विरोधकांना चांगलेच फटकारून काढले. 'राज्यसभेत चांगली चर्चा झाली, माझ्यावर सुद्धा टीका टिप्पणी झाली पण मी तुमच्या कामी तर आलो. मोदी आहे तर मौका आहे, तुम्ही लाभ घेऊ शकता' असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांनी टोला लगावला.
राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान मोदी यांनी सडेतोड भाषण केले. भाषणाचा शेवट करत असताना मोदींनी आपल्या खास शैलीत विरोधकांना चांगलेच चिमटे आणि कोपरखळी लगावली.
'कुणाचा कुणाला कसा फायदा होऊ शकतो हे सांगता येत नाही. राज्यसभेत खूप चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली. माझ्यावर सुद्धा हल्ले झाले आहे. पण मी तुमच्या कामी तरी आलो. कोरोनामुळे लॉकडाउन लागला होता. त्यामुळे बाहेर जाता आले नाही. त्यामुळे घरात वाद असतील. आता घरात तर राग काढू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी राज्यसभेत राग काढला. आता तुम्हाला घरात शांतपणे राहता येत असेल. यासाठी मी तुमच्या कामी आलो हे माझ्या सौभाग्य आहे, असा टोला मोदींनी लगावला.
'तुम्ही असा आनंद कायम घेत राहा, अशी माझीच इच्छा आहे. चर्चा केलीच पाहिजे, संसदेला जिवंत ठेवत राहा, मोदी आहे मौका घेत राहा, असा टोलाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना लगावला.
शरद पवारांना टोला
'शरद पवार यांनी शेती कायदे सुधार करण्यासाठी प्रयत्न केले. शरद पवार यांनी शेती कायद्यात सुधार करण्यास मत व्यक्त केले होते. पण त्यांनी कायद्याला विरोध केला नाही. आज आम्ही चांगले विचार मांडले याचा अर्थ असा नाही की 10 वर्षानंतर चांगले विचार असू शकत नाही. पण अचानक यू-टर्न का घेतला हे मात्र कळू शकले नाही. तु्म्ही शेतकऱ्यांना सुद्धा सांगू शकता की, नवीन कायदे आहे ते स्वीकारले पाहिजे' असा टोला मोदींनी शरद पवारांना लगावला.
ममतादीदींवर निशाणा
'आम्ही छोट्या शेतकऱ्यांसाठी 90 हजार कोटी फायदा मिळवून दिला आहे, हा आकडा कर्जमाफीपेक्षा सुद्धा जास्त आहे. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना फायदा मिळवण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्याचे ठरवले आणि राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा थेट फायदा झाला आहे. तसंच 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात किसान जीवन विमा योजनेतून थेट पैसे जमा केले आहे. बंगालमध्ये राजकारण झाले नसते तर तेथील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा झाले असते, असं म्हणत मोदींनी ममतादीदींवर निशाणा साधला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narendra modi, Pm in rajyasabha, PM Naredra Modi, Rajyasabha