Home /News /national /

PM Narendra Modi Birthday : पुतिन यांनी रशियातून पाठवला शुभेच्छा संदेश; मोदींबद्दल काय म्हणालेत वाचा..

PM Narendra Modi Birthday : पुतिन यांनी रशियातून पाठवला शुभेच्छा संदेश; मोदींबद्दल काय म्हणालेत वाचा..

#ModiAt70 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मोदींना खास शुभेच्छासंदेश पाठवला आहे. तुमच्या काळात द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत झाल्याचं म्हटलं आहे. पुतिन यांनी मोदींबद्दल काय शब्द वापरले आहेत वाचा...

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज सत्तरावा वाढदिवस. देशभरातून त्यांच्यासाठी शुभेच्छांचा ओघ सुरू आहे. परदेशातल्या काही बड्या नेत्यांनीही पंतप्रधानांना शुभेच्छा संदेश पाठवले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त खास त्यांच्यासाठी शुभेच्छा संदेश पाठवून मनःपूर्वक अभिनंदन केलं आहे. तुमच्या नेतृत्वाखाली भारत सर्वच क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत असल्याचं रशियन अध्यक्षांनी म्हटलं आहे. तसंच रशिया- भारत द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यात मोदींचं वैयक्तिक योगदान मोठं असल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे. भारत-चीन सीमेवर तणाव असताना या शब्दांत पुतिन यांनी वैयक्तिकरीत्या भारतीय पंतप्रधानांना शुभेच्छा देणं विशेष मानलं जात आहे. रशियाचे बलाढ्य नेते पुतिन यांनी नेमकं संदेशात काय म्हटलंय हे त्यांच्याच शब्दांत (अर्थात अनुवादित)वाचा. माननीय पंतप्रधान, आपल्या 70 व्या वाढदिवसानिमित्त माझ्या या हार्दिक अभिनंदनाचा स्वीकार करा. सरकारचे प्रमुख म्हणून तुम्ही केलेल्या कामामुळे तुमच्याबद्दलचा भारतीय जनतेमधला आदर वाढला आहे. या कामामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही तुमची प्रतिष्ठा वाढली आहे. तुमच्या नेतृत्वाखाली भारत सामाजिक- आर्थिक, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या पातळीवर यशस्वी वाटचाल करत आहे. आपल्या दोन देशांदरम्यानचे सामरिक आणि राजनैतिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी तुमचं वैयक्तिक योगदान मोठं आहे. आपल्यामध्ये निर्माण झालेलं मैत्रीपूर्ण, सौहार्द नातं माझ्या लेखी मौल्यवान आहे. तुमच्याबरोबर द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय अंजेंडाविषयक संवाद असाच सुरू राहील, आणि तुमच्याबरोबर असंच काम करता येईल अशी मी आशा करतो. तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद आणि यश मिळत राहो यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आदरपूर्वक आपला, व्ही. पुतिन अध्यक्ष, द रशियन फेडरेशन मोदी पंतप्रधानपदी आल्यानंतर या दोन नेत्यांची भेट झालेली आहे. पुतिन यांचा भारत दौराही झाला होता. रशियाशी भारताची मैत्री ही जुनी आणि घट्ट आहे. स्वातंत्र्यानंतर लगेचच रशियाबरोबर भारताचं मैत्रीपर्व सुरू झालं. मध्यंतरी भारताची अमेरिकेशी जवळीक वाढल्यानंतर या संबंधांमध्ये थोडाफार तणाव आला होता. पण मैत्री कायम होती. आता भारत- चीन सीमेवर तणाव निर्माण झालेला असताना भारत जगभरातल्या मित्रराष्ट्रांना एकत्र करून बाजू बळकट करण्याच्या प्रयत्नात आहे. म्हणूनच Coronavirus च्या लॉकडाऊननंतर पाच महिन्यांनंतरचा भारतीय परराष्ट्र मंत्र्यांचा दौरा रशियात झाला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर नुकतेच मॉस्को इथे एका बैठकीला उपस्थित होते.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Narendra modi, Vladimir putin

    पुढील बातम्या